अमित शहांच्या सभेत पिस्तुल घेऊन घुसण्याचा प्रयत्न

पश्चिम बंगालमधील कोलकातामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका जाहीर सभेत एक व्यक्ती थेट पिस्तुल घेऊन आत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं आहे.

person trying to enter in amit shah's rally with pistol police is questioning
अमित शहांच्या सभेत पिस्तुल घेऊन घुसण्याचा प्रयत्न  |  फोटो सौजन्य: ANI

कोलकाता: गृहमंत्री अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालमधील शहीद मीनार मैदानावर एका रॅलीला संबोधित केलं. या सभेत त्यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार निशाणा साधला. रॅलीदरम्यान, जेव्हा लोकं सभेच्या ठिकाणी जात होती, तेव्हा सुरक्षा कर्मचार्‍यांसमोर एक अशी घटना घडली की, ज्यामुळे सर्व जण अलर्ट झाले. या सभेसाठी व्हीआयपी गेटमधून आलेल्या एका व्यक्तीकडून ९ एमएमची पिस्तूल सापडली. ज्यामुळे सुरक्षा कर्मचार्‍यांना देखील धक्का बसला. 

त्यानंतर, त्या व्यक्तीची बराच वेळ चौकशी केली गेली. चौकशीदरम्यान त्या व्यक्तीने सांगितले की, ती त्याची परवाना असलेली पिस्तूल आहे जी त्याने आपल्या सुरक्षिततेसाठी ठेवली होती. या सभेसाठी मैदानात बरेच गेट्स उभारले गेले होते आणि जिथून हा माणूस आत जात होता तो व्हीआयपी गेट होता. या गेटमधून केवळ मीडिया आणि राजकीय नेत्यांनाच आत जाण्याची परवानगी होती. दरम्यान, एक माणूस याच गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला मेटल डिटेक्टरद्वारे पकडण्यात आलं.

यानंतर पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता त्याने कमरेला पिस्तूल लावलेलं त्यांना सापडलं. चौकशीदरम्यान त्या व्यक्तीने असा दावा केला की त्याचा कोणताही वाईट हेतू नव्हता. आपल्या स्वत:च्या सुरक्षेसाठी त्याने हे परवाना असलेलं पिस्तुल बाळगलं होतं. अद्यापही पोलीस त्या व्यक्तीची चौकशी करत आहेत. दरम्यान, पोलीस या प्रकरणी वेगवेगळ्या पैलूतून त्या व्यक्तीची चौकशी करत आहे. तो सभेच्या ठिकाणी नेमका पिस्तूल का घेऊन आला होता आणि त्याचा नेमका हेतू काय होता हे जाणून घेण्याचा पोलीस सध्या प्रयत्न करत आहे.

याआधी सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, देशातील सर्व निर्वासितांना सीएएअंतर्गत नागरिकत्व दिल्याशिवाय नरेंद्र मोदी सरकार थांबणार नाही. अमित शहा म्हणाले की, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष दोन तृतीयांश बहुमताने बंगालमध्ये पुढचे सरकार स्थापन करेल. तृणमूल कॉंग्रेससह विरोधी पक्ष हे शरणार्थी आणि अल्पसंख्याकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप  शाह यांनी केला. यावेळी ते असंही म्हणाले की, नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे (सीएए) एकाही व्यक्तीचे नागरिकत्व जाणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी