शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीला कोरोनाचा धोका, सर्वोच्च न्यायालयात याचिका

राज्याच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे संपूर्ण दिल्लीला कोरोनाचा मोठा धोका आहे. हा धोका ओळखून आंदोलक शेतकऱ्यांना हटवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे

Petition filed before Supreme Court seeking directions for immediate removal of agitating farmers
शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीला कोरोनाचा धोका 

थोडं पण कामाचं

  • शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीला कोरोनाचा धोका, सर्वोच्च न्यायालयात याचिका
  • आंदोलनामुळे दिल्लीसह शेजारी राज्यांना कोरोनाचा धोका
  • सर्वोच्च न्यायालयात शाहीन बाग केसचा दिला संदर्भ

नवी दिल्ली: राज्याच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे संपूर्ण दिल्लीला कोरोनाचा मोठा धोका आहे. हा धोका ओळखून आंदोलक शेतकऱ्यांना हटवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. अॅडव्होकेट ओमप्रकाश परिहार यांनी ही याचिका केली आहे. (Petition filed before Supreme Court seeking directions for immediate removal of agitating farmers)

देशात कोरोना महामारी सुरू आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी महामारी कायदा लागू आहे. या परिस्थितीत आरोग्य सेवा आणि आपत्कालीन आरोग्य सेवांना बाधा होईल अशी कोणतीही कृती करण्यास सक्त मनाई असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य सेवांवर ताण येत आहे.

कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. कोरोनाचे विषाणू नाकावाटे अथवा तोंडावाटे शरीरात जाण्याचा सर्वाधिक धोरा आहे. या आजारावर अद्याप औषध किंवा लस बाजारात उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत गर्दी केल्यामुळे कोरोना पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. मागील काही दिवसांत कोरोना नियंत्रणात येत आहे, असे चित्र होते. पण सणांच्या दिवसांत बाजारांमध्ये गर्दी झाली. नागरिकांची एकमेकांकडे होणारी ये-जा वाढली आणि दिल्लीतले कोरोनाचे रुग्ण वाढले. आता शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीच्या सीमावर्ती भागात प्रचंड गर्दी आहे. पोलिसांना त्यांची इतर कामं सोडून सीमावर्ती भागात बंदोबस्तासाठी रात्रंदिवस उभे राहावे लागत आहे. दिल्लीच्या सीमेवरील प्रचंड गर्दीमुळे दिल्ली तसेच शेजारी राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढून संकटाची तीव्रता वाढण्याचा धोका आहे, अशी चिंता याचिकाकर्ते अॅडव्होकेट ओमप्रकाश परिहार यांनी व्यक्त केली आहे. 

सध्याच्या संकटाचा विचार करुन आंदोलकांनी मर्यादीत संख्येने आंदोलनासाठी निश्चित असलेल्या ठिकाणी जावे आणि आंदोलन करावे. पण कोरोना संकटाला प्रत्यक्ष अथवा प्रत्यक्षपणे कारणीभूत होऊ नये, अशी भूमिका याचिकाकर्ते अॅडव्होकेट ओमप्रकाश परिहार यांनी मांडली आहे. शेतकरी त्यांच्या मागण्या घेऊन २६ नोव्हेंबरपासून दिल्लीच्या सीमेवर गोळा झाले आहे. केंद्र सरकार त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहे. चर्चेतून तोडगा निघू शकेल पण सीमेवरील गर्दीमुळे कोरोनाचे संकट वाढण्याची शक्यता आहे. ही बाब ओळखून शेतकऱ्यांनी चर्चा सुरू ठेवावी पण सीमेवर गर्दी करणे टाळावे, असे याचिकाकर्ते अॅडव्होकेट ओमप्रकाश परिहार यांचे म्हणणे आहे.

काही महिन्यांपूर्वी शाहीनबाग आंदोलन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता. आंदोलन करण्यासाठी निश्चित जागा आहे, तिथेच आंदोलन करावे. आंदोलनाच्या नावाखाली सलग काही दिवसांसाठी रस्ता अडवून वाहतूक बंद पाडणे बेकायदा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते. या निकालाचा संदर्भ देत याचिकाकर्ते अॅडव्होकेट ओमप्रकाश परिहार यांनी आंदोलक शेतकऱ्यांना हटवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिकेद्वारे केली आहे. सलग काही दिवस रस्ते अडवून शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने कोरोना संकटाची तीव्रता वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतील, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी