कोरोनावरील लस संदर्भात मोठी बातमी 

Coronavirus Vaccine: कोरोना संकटावर मात करण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्नशील आहे. कोरोनावर लस विकसित कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्याच दरम्यान आता एका फार्मा कंपनीने मोठा दावा केला आहे.

pfizer pharma company claims covid19 vaccine may be available by october end 
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • जगभरात कोरोनाचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत ३.६७ लाखांहून अधिक बाधितांचा मृत्यू झाला आहे 
  • जगभरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे आणि बाधितांचा आकडा आता ६०.५५ लाखांहून अधिक झाला आहे
  • कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी जगभरातील विविध देश यावर लस विकसित करण्याचे काम करत आहेत

न्यूयॉर्क: औषध निर्माता फायझर कंपनीला विश्वास आहे की, कोविड-१९ ला रोखणारी लस ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीसपर्यंत तयार होईल. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोरला यांनी ही माहिती दिली आहे. फायझर ही जर्मन एमआरएनए कंपनी बायोएनटेक सोबत मिळून कोविड-१९ ला रोखण्यासाठी बीएनटी १६२ लस विकसित करण्यासाठी कार्यरत आहे. या लस संदर्भात अमेरिका आणि युरोपमध्ये चाचणी सुद्धा सुरू आहे.

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयएफपीएमए)च्या वतीने आयोजित वर्च्युअल कार्यक्रमात भाग घेतला असताना अल्बर्ट बोरला यांनी या आठवड्यात हे वक्तव्य केलं आहे. या कार्यक्रमात बोरला म्हणाले, जर गोष्टी व्यवस्थित झाल्या तर आमच्याकडे एफडीए (यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन) आणि ईएमए (यूरोपीयन मेडिसिन एजन्सी) कडे सुरक्षिततेचे आणि कार्यक्षम पुरेसे पुरावे असतील. आमच्याकडे ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत लस उपलब्ध असेल.

लस विकसित करण्यात कंपन्या गुंतल्या 

या कार्यक्रमात एस्ट्राजेनेकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरियट, ग्लॅक्सोस्मिथक्लाइनचे प्रमुख एमा वाल्स्ले, जॉन्सन अँड जॉन्सनचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी पॉल स्टॉफल्स यांनी सहभाग घेतला होता. यापैकी प्रत्येक कंपन्या त्यांच्या भागीदारांसह रोग प्रतिबंधक लस विकसित करण्याच्या कामात गुंतल्या आहेत. एस्ट्राजेनेका ऑक्सफर्ड विद्यापीठात विकसित होत असलेल्या लसीला पाठिंबा देत समर्थन करत आहेत.

जे अँड जे आपली लस विकसित करण्यासाठी अमेरिकेतील बायोमेडिकल अॅडव्हान्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी सोबत सहकार्य करत आहे. आतापर्यंत जगभरात १२० हून अधिक लस प्रस्तावित आहेत. सध्या, क्लिनिकल चाचण्यांमध्ये कमीत कमी १० लस आहेत आणि ११५ लसची क्लिनिकमध्ये पूर्व चाचणीचं मूल्यांकन सुरू आहे.

WHOचा लसींच्या चाचणीवर जोर 

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जास्तीत जास्त लसींचे मूल्यांकन करणे महत्वाचे आहे कारण आपल्याला अंदाज वर्तवण्यात येऊ शकत नाही की प्रत्यक्षात किती यशस्वी होईल. ही शक्यता अधिक बळकट करण्यासाठी सर्व लसींची चाचणी यशस्वी होईपर्यंत घेणं आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी