Tagore, Kalam on Currency Notes | भारतीय चलनी नोटांवर आता राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जोडीला इतरही महापुरुषांचे फोटो झळकणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं यासाठीची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या महापुरुषांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात नोबेल पुरस्कार विजेते साहित्यिक आणि भारतीय राष्ट्रगीताचे जनक रविंद्रनाथ टागोर आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम यांचा समावेश असणार आहे.
स्वातंत्र्यापासून आजवर भारतीय चलनी नोटांवर केवळ राष्ट्रपिता महात्मा गांधींचाच फोटो छापला जात होता. पहिल्यांदाच गांधींव्यतिरिक्त इतर महापुरुषांचा फोटो भारतीय नोटांवर छापला जाणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यासाठी एकत्रित काम करत असून लवकरच याबाबतचा निर्णय अधिकृतरित्या जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. टागोर आणि कलाम यांचे नोटांवर छापण्यासाठी वॉटरमार्क तयार झाले असून ते सिक्युरिटी मीटिंग अँड प्रिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे पाठवण्यात आले आहेत.
आयआयटी दिल्लीत कार्यरत असणारे प्रा. दिलीप शहा यांनी हे वॉटरमार्क तयार केले आहेत. वॉटरमार्क आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इन्स्टूमेंटेशन हा त्यांच्या स्पेशलायझेशनचा विषय आहे. याच वर्षी जानेवारी महिन्यात पद्मश्री पुरस्कार देऊन केंद्र सरकारने त्यांना गौरवित केलं होतं.
2017 साली नोटांच्या नव्या मालिकेची सुरक्षा वैशिष्ट्ये तपासण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक समिती स्थापन करण्यात आली होती. 2020 साली त्यांनी आपला अहवाल सादर केला होता. त्यानंतर नोटा छापताना महात्मा गांधींशिवाय रविंद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्याही वॉटरमार्कचा नोटांवर उपयोग करण्याच्या संकल्पनेला ग्रीन सिग्लन मिळाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
अधिक वाचा - Nigeria: नायजेरियातील चर्चवर अंदाधुंद गोळीबार, हल्ल्यात 50 हून अधिक जण ठार
2000 रुपयांची नोट वगळता इतर सर्व नोटांवर रविंद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा छापल्या जाणार आहेत. भारतात आतापर्यंत नोटा आणि महात्मा गांधी हे समीकरण रुढ झालं आहे. यापुढे मात्र इतर महापुरुषही नोटेवर झळकणार आहेत. त्यामुळे पुढील काही वर्षात भारतातील अनेक महापुरुषांच्या प्रतिमा नोटांवर दिसू लागण्याची शक्यता आहे.