Kashi Vishwanath Dham Inauguration वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (सोमवार १३ डिसेंबर २०२१) आणि उद्या (मंगळवार १४ डिसेंबर २०२१) असे दोन दिवस वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्याची सुरुवात काळभैरवाच्या दर्शनाने होईल. दरबारात पूजनाचा कार्यक्रम होईल. बाबा कोतवाल यांच्याकडून परवानगी घेऊन पीएम मोदी विश्वनाथ धाम (Shri Kashi Vishwanath Dham) येथे पोहोचतील.
बाबांचे दर्शन घेतल्यानंतर पीएम मोदी श्री विश्वनाथ कॉरिडोरचे लोकार्पण करतील. या कार्यक्रमानंतर पीएम मोदी बरेका गेस्ट हाउस येथे दाखल होतील. संध्याकाळी रो-रो बोटीतून पीएम मोदी गंगा आरतीसाठी पोहोचतील. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आरतीसाठी आणखी प्रमुख नेते पोहोचतील. गंगा आरती नंतर पीएम मोदी पुन्हा बरेका गेस्ट हाउस येथे परततील.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पीएम मोदी दुपारी एकच्या सुमारास काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्याच्या ३३९ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करतील. भगवान शंकराच्या भाविकांच्या सोयीसाठी काशी विश्वनाथ धाम प्रकल्प सुरू आहे.
गंगा नदीच्या किनाऱ्यावर काशी विश्वनाथ कॉरिडॉर विकसित होत आहे. यात काशी विश्वनाथ धाम ते काशी विश्वनाथ मंदिर असा सरळ रस्ता आहे. काशी विश्वनाथ मंदिर, काशी विश्वनाथ धाम आणि या दरम्यानचा रस्ता तसेच भोवतालचा परिसर येथे मोठ्या प्रमाणावर विकासकाम सुरू आहे. दिव्य काशी भव्य काशी अंतर्गत सुरू असलेल्या या योजनेतील पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण होईल. प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांच्या नियोजनाचा आढावा पंतप्रधान मोदी घेणार आहेत.
पीएम मोदी यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर विकसित करण्याच्या योजनेचा शुभारंभ मार्च २०१९ मध्ये केला. या प्रकल्पातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, ज्याचे औपचारिक उद्घाटन पीएम मोदी करतील.
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते बाबा काळभैरवाचे दर्शन घेतील. तिथे दर्शन पूजन झाल्यावर ललिता घाट परिसरात दाखल होतील. तिथून काशीच्या बाबा विश्वनाथ धाम येथे दाखल होतील. पीएम मोदी संध्याकाळी देभरातून आलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत गंगा आरती करतील. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पीएम मोदी देशभरातून आलेल्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधतील. यानंतर पंतप्रधान वाराणसी येथील उमरहा येथे असलेल्या स्वर्वेद मंदिराच्या वार्षिकोत्सवात सहभागी होतील. या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांची एक सभा होणार आहे.
काशी विश्वनाथ कॉरिडॉर हे भारतीय आणि विदेशी पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे. या कॉरिडॉरमध्ये पीएम मोदींचे स्वागत करण्यासाठी इमारतींवर रोषणाई केली जाईल. कॉरिडॉर परिसरात भित्तीचित्रांद्वारे वाराणसीतील कला आणि संस्कृती यांचे प्रदर्शन आकर्षक पद्धतीने सादर केले आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २३ इमारतींचे लोकार्पण होईल. यात भाविकांसाठी सुविधा केंद्र, वैदिक केंद्र, मुमुक्षु भवन, भोगशाला, शहर संग्रहालय आणि फूड कोर्ट यांच्यासह अनेक सोयीसुविधा आहेत. प्रकल्प पाच लाख चौरसफूट परिसरात पसरला आहे.