आतापर्यंत ज्या ज्या योजना पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारनं आणल्या आहेत, त्या समाजातील विविध घटकांकडून नाकारण्यात आल्याचं राहुल गांधी म्हणाले. सध्याच्या अग्निपथ योजनेला देशातील तरुणांनी नाकारलं, तीन कृषी कायद्यांना देशातील शेतकऱ्यांनी नाकारलं, नोटाबंदीच्या निर्णयाला देशातील अर्थतज्ज्ञांनी नाकारलं आणि जीएसटीला देशातील व्यापाऱ्यांनी नाकारलं, अशी टीका त्यांनी केली. सर्वसामान्य जनतेचा आवाज ऐकून या योजना आणल्या असत्या, तर अशी परिस्थिती उद्भवली नसती. मात्र मोदी हे फक्त त्यांच्या मित्रांचंच ऐकतात आणि त्यामुळे जनतेच्या विरोधातील योजना आणतात, अशी टीका त्यांनी केली.
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने ही योजना मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केली आहे. केंद्र सरकारनं पुढच्या 24 तासांत या योजनेत बदल करून नव्या नियमांसह ही योजना जनतेसमोर सादर करावी लागली, याचाच अर्थ पूर्ण विचार न करता ही योजना आणण्यात आली होती, अशी टीका त्यांनी केली आहे.
ही योजना तातडीनं मागे घ्यावी आणि रद्द करावी, अशी मागणी प्रियंका गांधींनी केल आहे. एअर फोर्समध्ये अनेक जागांवर भरतीची प्रक्रिया शिल्लक आहे. ही भरती लवकरात लवकर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. वयोमानाच्या अटीत सूट देऊन इतर सर्व योजना आधीप्रमाणेच लागू करावी, अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे.
सशस्त्र दलांमध्ये अल्पावधीसाठी तरुणांना दाखल करून घेण्याचा प्रकार चुकीचा असून सरकारनं हा प्रकार बंद करावा, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत सरकारने चर्चा करावी आणि देशातील तरुणांची गरज आणि देशाच्या संरक्षणाची गरज यांचा नीट अभ्यास करून व्यवहारी योजना आखावी, असा सल्ला काँग्रेसनं सरकारला दिला आहे.