'दीदी तुमच्या घरी येऊन तुमच्या हातचे गुजराती पदार्थ नक्की खाईन', मोदींचा 'मन की बात'मधून लता दीदींशी संवाद

Pm Modi Mann ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून लता दीदींशी संवाद साधला. यावेळी मोदींनी लता दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

pm modi mann ki baat lata mangeshkar as a special guest joining in mann ki baat 
'दीदी तुमच्या घरी येऊन तुमच्या हातचे गुजराती पदार्थ नक्की खाईन', मोदींचा 'मन की बात'मधून लता दीदींशी संवाद  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान मोदींचा मन की बात कार्यक्रम, लता दीदींशी साधला संवाद
  • ई-सिगारेटपासून तरुणांनी दूर राहण्याचं केलं मोदींनी आवाहन
  • पंतप्रधान मोदींनी मन की बातमधून देशवासियांना केलं संबोधित

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं. या कार्यक्रमाआधी पंतप्रधान मोदींनी ट्वीट करुन अशी माहिती दिली की, आज या कार्यक्रमात आपल्यासोबत एक खास पाहुणे असणार आहेत. यावेळी आपल्या मन की बात कार्यक्रमाची सुरुवात ही पंतप्रधान मोदींनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन केली. याचवेळी पंतप्रधान मोदींनी लता मंगेशकर यांना काही दिवसापूर्वीच फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांचं हेच फोनवरील संभाषण आजच्या 'मन की बात'मध्ये ऐकवण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी लता दीदींना असंही सांगितलं की, 'मी लवकरच तुमच्या घरी येईन आणि तुम्ही तुमच्या हाताने बनवलेले गुजराती पदार्थ नक्की खाईन.' 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या लता दीदींना शुभेच्छा

'नमस्कार दीदी मी नरेंद्र मोदी बोलतोय! तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. तुमचा वाढदिवस २८ तारखेला आहे. त्यादिवशी मी विमान प्रवासात असेल त्यामुळे मला तुम्हाला फोन करणं शक्य होणार नाही. त्यामुळे अमेरिकेला जाण्याआधीच मी तुम्हाला फोन केला. आपल्या शुभेच्छा आणि आपले आशीर्वाद कायम असू देत. आपण जे काही कमावलं आहे ते आपण आपल्या साधनेतून कमावलं आहे. आपली नम्रता आम्हाला खूप काही शिकवून जाते. मला नेहमी आनंद वाटतो की, तुम्ही जेव्हाही गर्वाने सांगता की, आपली आई ही गुजराती होती. मी जेव्हाही आपल्याकडे आलो तेव्हा आपण मला गुजराती पदार्थ खाऊ घालता. दीदी आपले आशीर्वाद आमच्यावर आणि देशावर कायम असू देत. आपण नेहमी मला प्रेरणा दिली आहे.'  

'तुमचं पत्र मला मिळत असतं. तुमच्या भेटवस्तू देखील मला मिळत असतात. त्यामुळे माझं एक कौटुंबिक नातं आपल्याशी आहे असं मी मानतो. मी आपला खूप आभारी आहे की, आपण नेहमी माझी चिंता करता. यावेळेस मुंबईला आलो तेव्हा असं वाटलं की, तुमची भेट घेण्यासाठी लागलीच येऊ. पण वेळेअभावी मला ते शक्य झालं नाही. पण मी लवकरच तुमच्या घरी येईन आणि तुम्ही तुमच्या हाताने बनवलेले गुजराती पदार्थ नक्की खाईन. प्रणाम दीदी, माझ्या तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...' 

पाहा पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये नेमकं काय-का म्हणाले: 

नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाची ही दुसरी टर्म आहे. या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी चौथ्यांदा मन की बातमधून देशवासियांशी संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी असं म्हणाले की, ' नवरात्रीसह आजपासूनच उत्सवांचे वातावरण पुन्हा नवीन उत्साह, नवी उर्जा, नवे संकल्प याने भरून जाईल. पण या सणांमध्ये आजही काही जण हे आनंदापासून वंचित असतात. यालाच दिव्याखाली अंधार असं म्हणतात. काही घरांमध्ये मिठाई अक्षरश: खराब होऊन जाते. तर काही घरात मुलांना मिठाई मिळेनाशी होते. काही जणांना कपडे ठेवण्यासाठी कपाटं पुरत नाही तर काही जणांना अंग झाकण्यासाठीही पुरेसे कपडे नसतात.' 

'आज आपल्या समाजात अनेक मुली आहेत. ज्यांनी आपल्या दृढ निश्चयाने, मेहतीने आणि प्रतिभेच्या जोरावर आपलं कुटुंब, समाज आणि देशाचा गौरव वाढवला आहे. या दिवाळीत आपण भारतातील लक्ष्मीला सन्मानित करण्यासाठी एखाद्या कार्यक्रमाची व्यवस्था करु शकतो? आपण हॅशटॅग #BHARATKILAXMI वापरुन सोशल मीडियावर त्यांनी जे साध्य केलं आहे त्या मुलींच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकू शकतो.' असंही मोदी यावेळी म्हणाले. 

याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी तरुणांनी ई-सिगरेटपासून दूर राहण्याचं आवाहन देखील केलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी अमेरिकेच्या आठवड्याभराच्या दौऱ्यावरुन परत आले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी ते असं म्हणाले की, 'मागील ५ वर्षात भारताच मान हा वैश्विक स्तरावर खूपच वाढला आहे.' यावेळी पंतप्रधान मोदींना या स्वागत समारंभाबाबत आभार व्यक्त केले. 

ऑक्टोबर २०१४ पासून पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' हा कार्यक्रम सुरु केला होता. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा जून महिन्यापासून या कार्यक्रमला सुरुवात केली. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत मन की बातचे ५७ एपिसोड केलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी