PM Modi offered prayers at Kalika Temple in Pavagadh, hoisted the flag on the summit after 500 years : गुजरातमधील पंचमहल जिल्ह्यातील पावागड येथे महाकाली मंदिर आहे. शक्तिपीठ असूनही या मंदिरावर १५४० पासून कळस नव्हता. कळस नसल्यामुळे कळसावर फडकवला जाणारा धर्मध्वज पण मंदिरावर नव्हता. अखेर आज शनिवार १८ जून २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंदिराच्या सोन्याच्या कळसावर धर्मध्वज फडकला. पंतप्रधानांच्या हस्ते मंदिरात पूजा करण्यात आली. शेकडो वर्षांनतर पावागड मंदिरावर धर्मध्वज फडकत आहे.
पावागड येथील महाकाली मंदिराच्या कळसाच्या जागेजवळ असलेली दर्गा हटविण्यात आली आहे. मंदिरापासून दूर एका कोपऱ्यात दर्गा स्थलांतरित करण्यात आली आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे.
पावागडचे शक्तिपीठ उंच डोंगरावर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी आता पायथ्यापासून सुरुवातीच्या पाच किमी पर्यंत उत्तम रस्ता आहे. यानंतर सुमारे अडीच हजार पायऱ्या आणि रोप वे असे दोन पर्याय आहेत. अंतिम टप्प्यात तीनशे पायऱ्या सर्व भाविकांना चढून जाव्या लागतात. ज्यांना काही कारणाने चालणे शक्य नाही अशा भाविकांना पालखीतून अथवा पिठ्ठू म्हणजे एखाद्या स्थानिकाच्या पाठीवरून तीनशे पायऱ्या पार करता येतात.
मुघलांनी पावागड येथील महाकाली मंदिरावर सोळाव्या शतकात हल्ला केला होता. मोहम्मद बेगडा याने १५४० मध्ये महाकाली मंदिराचा कळस तोडला. यानंतर मंदिराच्या मागील बाजूस उंच आणि कळसाच्या जागेजवळ येईल अशा पद्धतीने एक दर्गा बांधली. या दर्गामुळे पावागड मंदिरावर कळस पुन्हा तयार करणे कठीण झाले. कळस नसल्यामुळे मंदिराच्या कळसावरील धर्मध्वज फडकाविणेही कठीण झाले.
अखेर पावागड येथील मंदिरामागच्या दर्गाचा प्रश्न सुटला. परस्पर सामंजस्यातून तोडगा काढण्यात आला. दर्गा पर्यायी जागेवर स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला. यानंतर संपूर्ण मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय झाला. नव्या मंदिरावर सोन्याचा कळस आहे. याच मंदिरावर धर्मध्वजाचे ध्वजारोहण झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहणानंतर नागरिकांना उद्देशून एक भाषण दिले. पावागडच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. शेकडो वर्षांनी मंदिरावर कळस तयार करण्यात आला आणि मंदिरावर धर्मध्वज आला. ही बाब माझ्यासाठी प्रेरणा देणारी आणि ऊर्जा देणारी अशी असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. संकल्पाचे स्वप्नात आणि स्वप्नाचे प्रत्यक्षात आलेले रुप पाहून आनंद वाटत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात अयोध्येतील राम मंदिर आणि वाराणसीतील काशी विश्वनाथ धाम मंदिर यांचा उल्लेख केला. देश आधुनिक स्वप्न पूर्ण करतानाच प्राचीन संस्कृतीचेही जतन करत आहे. भारत गमावलेला अध्यात्मिक आणि सांस्कृतिक गौरव परत मिळवत आहे; असे पंतप्रधान मोदी म्हणाले.