संविधानदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानवर हल्लाबोल, विरोधकांवरही साधला निशाणा

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 26, 2020 | 16:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आजचा भारत २६/११चा दहशतवादी हल्ला कधीही विसरू शकत नाही, कारण हा भारताच्या भूमीवरील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक होता.

PM Narendra Modi
संविधानदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानवर हल्लाबोल, विरोधकांवरही साधला निशाणा 

थोडं पण कामाचं

  • २६/११चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला
  • संविधान, आणीबाणी आणि इतर
  • कोरोनाविरुद्धची लढाई आणि बिहार निवडणुका

नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींनी (PM Modi) गुरुवारी संविधान दिनाच्या (Constitution Day) निमित्ताने ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर्स कॉन्फरन्समध्ये (All India Presiding Officers’ Conference) भाषण (address) केले. संविधान दिनाचे औचित्य साधून यावेळी ते म्हणाले की, बापूंची म्हणजेच महात्मा गांधींची (Mahatma Gandhi) प्रेरणा आणि सरदार वल्लभभाई पटेलांची (Sardar Vallabhbhai Patel) कटिबद्धता यासमोर माथा झुकवण्याचा आजचा दिवस आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “अशा अनेक व्यक्तिमत्वांनी भारताच्या विकासाचा रस्ता आखला आहे. पाच वर्षांपूर्वी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.”

२६/११चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात पाकिस्तानचे नाव घेतले आणि म्हटले की, पाकिस्तानने पाठवलेल्या दहशतवाद्यांनी याच दिवशी २००८ साली मुंबईवर हल्ला केला होता. ते म्हणाले, “अनेक भारतीय आणि परदेशी नागरिक मृत्युमुखी पडले. मी या हल्ल्यात शहीद झालेल्या त्या सर्वांना तसेच पोलीस आणि सुरक्षादल कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.” पुढे ते म्हणाले की आजचा भारत २६/११चा दहशतवादी हल्ला कधीही विसरू शकत नाही, कारण हा भारताच्या भूमीवरील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक होता. ते म्हणाले, “आजचा भारत नव्या नीतीसह आणि रीतीसह दहशतवादाचा सामना करत आहे.”

संविधान, आणीबाणी आणि इतर

संविधानाबाबत बोलताना पंतप्रधानांनी म्हटले की, १९७०च्या दशकात अधिकारांच्या वितरणाची यंत्रणा उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, मात्र या प्रयत्नाचे उत्तरही संविधानानेच दिले. ते म्हणाले, “आणीबाणीनंतर देशातील टेहळणीच्या यंत्रणा मजबूत झाल्या. कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ आणि न्यायपालिका या तिन्ही स्तंभांना या काळात अनेक धडे मिळाले आणि त्यांची प्रगती झाली. १३० कोटी भारतीयांनी प्रगल्भता दाखवली आहे आणि यामागचे सर्वात महत्वाचे कारण आहे संविधानाच्या या तीन स्तंभांवरील त्यांचा विश्वास.”

कोरोनाविरुद्धची लढाई आणि बिहार निवडणुका

त्यांनी यावेळी संसदेने योजनेपेक्षा अधिक तास काम केल्याचा तसेच खासदारांनी आपल्या वेतनात केलेल्या कपातीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, अनेक राज्यातील आमदारांनी त्यांचे वेतन देशाच्या कोरोनाविरोधातील लढाईला मदत म्हणून दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या बिहारच्या निवडणुकांचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, कोरोनाच्या संकटादरम्यान जगाने भारताची मजबूत निवडणूक प्रक्रिया पाहिली आहे.

त्यांनी यावेळी लोकसभा आणि सर्व विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचाही पुरस्कार केला. तसेच एक देश, एक निवडणूक ही देशाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. लोकसभा, विधानसभा आणि पंचायतीच्या निवडणुकांसाठी एकच सामायिक मतदार यादी तयार करण्याची योजनाही त्यांनी बोलून दाखवली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी