देशात कोरोनाची दुसरी लाट, कोरोना चाचण्या वाढवा - पंतप्रधान

PM Modi stresses on testing, tracing in meeting with CMs भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. देशात लसीकरण सुरू आहे. लसीकरण यापुढेही सुरू राहील पण गरज आहे ती चाचण्या वाढवण्याची.

PM Modi stresses on testing, tracing in meeting with CMs
देशात कोरोनाची दुसरी लाट, कोरोना चाचण्या वाढवा - पंतप्रधान 

थोडं पण कामाचं

  • देशात कोरोनाची दुसरी लाट, कोरोना चाचण्या वाढवा - पंतप्रधान
  • लसीकरण आणि कोरोना चाचण्या या दोन्हीचा वेग वाढवणे आवश्यक
  • नाइट कर्फ्यू अर्थात रात्रीच्या संचारबंदीला कोरोना कर्फ्यू किंवा कोरोना संचारबंदी असे म्हणा

नवी दिल्ली: भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. देशात लसीकरण सुरू आहे. लसीकरण यापुढेही सुरू राहील पण गरज आहे ती चाचण्या वाढवण्याची. चाचण्या वाढवणे आणि कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना शोधून त्यांना क्वारंटाइन करणे तसेच त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. हे उपाय केले तरच कोरोना संकटावर नियंत्रण मिळवता येईल. फक्त लसीकरणावर जोर द्यायचा आणि कोरोना चाचण्या करण्याकडे दुर्लक्ष करायचे असे केले तर संकट नियंत्रणात येण्यास आणखी वेळ लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कोरोना संकट वाढू लागल्यामुळे पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने एक बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना कोरोना चाचण्या वाढवण्याची सूचना केली. PM Modi stresses on testing, tracing in meeting with CMs

लसीकरण सुरू झाल्यानंतर देशातील अनेकांनी मास्क घालणे सोडून दिले आहे. कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळेच कोरोना संकटाची दुसरी लाट आली आहे. काही राज्यांमध्ये कोविड प्रोटोकॉलच्या बाबतीत अवास्तव शिथीलता आली. या शिथीलतेचे परिणाम देश भोगत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्र सरकार यांना परस्पर समन्वय राखून एकत्र काम करावे लागेल. राजकारण करण्यासाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले तर कोरोना संकटावर मात करता येणार नाही, असेही पंतप्रधान म्हणाले. 

प्रत्येक राज्याने किमान ७० टक्के आरटी-पीसीआर चाचण्या आणि कमाल ३० टक्के अँटीजेन चाचण्या या पद्धतीने दररोज जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करणे आवश्यक दैनंदिन कोरोना चाचण्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. प्रतिबंध हाच कोरोनापासून बचावाचा सर्वोत्तम आणि प्रभावी मार्ग आहे. यासाठी लसीकरण आवश्यक आहे पण त्याहीपेक्षा जास्त गरज आहे ती चाचण्या वाढवण्याची. लसीकरण करण्याच्या नादात चाचण्यांकडे दुर्लक्ष झाले तसेच लसीकरण सुरू आहे म्हणून कोविड प्रोटोकॉलच्या उल्लंघनाचे प्रमाण वाढले तर कोरोना संकट नियंत्रणात येण्यासाठी आणखी वेळ लागेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

मागच्या वर्षीच्या तुलनेत आता देशाची परिस्थिती बरी आहे. कोरोना म्हणजे काय, तपासणी कशी करावी, उपाय कसे करायचे, लस कधी घ्यायची या संदर्भात नियोजन करण्याएवढी माहिती हाती आली आहे. मागच्या वर्षीप्रमाणे कोरोना हा आता अज्ञात आजार उरलेला नाही. लसीकरण आणि कोरोना चाचण्या या दोन्हीचा वेग वाढवला तसेच कोरोना रुग्ण आणि त्याच्या संपर्कात आलेल्यांना वेळेत क्वारंटाइन करुन त्यांची देखभाल केली तर परिस्थिती नियंत्रणात येईल. ठोस उपाय केले नाही तर संकटाची तीव्रता वाढेल; असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

ज्या राज्यांनी आरटी-पीसीआर चाचण्या वाढवल्या त्यांच्याकडे परिस्थिती नियंत्रणात आहे पण ज्या राज्यांनी अद्याप अनेकांची चाचणी केलेली नाही तिथे परिस्थिती बिघडली आहे. प्रत्येक कोरोना रुग्ण आणि त्याच्या संपर्कात आलेले किमान ३० जण यांची वेळेवर चाचणी झाली आणि त्यांची योग्य त्या प्रकारे वेळेत काळजी घेतली तर परिस्थिती नियंत्रणात येण्यास मोठी मदत मिले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोना झाल्याचे आढळले आहे. यामुळे रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना तातडीने शोधले तर कोरोना संकटाचा संसर्ग वेगाने पसरण्याचा धोका कमी करणे शक्य आहे. कोरोना विरुद्धच्या युद्धात थांबला तो संपला ही उक्ती लक्षात ठेवून अविश्रांत काम करणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याने सर्वपक्षीय बैठक घ्यावी. या बैठकीसाठी राज्यपाल, सर्वपक्षीय नेते, राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर अशांना आमंत्रित करावे. सार्वजनिक जीवनात ज्यांचा बहुसंख्य लोकांवर प्रभाव पडेल अशा व्यक्तींना बैठकीला बोलावून सत्यस्थितीची कल्पना द्यावी तसेच त्यांच्या सहकार्याने नागरिकांना आवाहन करावे. या प्रयत्नांचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो; असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. 

देशात ४५ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयानुसार प्रत्येक राज्याने जास्तीत जास्त पात्र नागरिकांचे लसीकरण करावे. रविवार ११ एप्रिल रोजी ज्योतिबा फुले जयंती आणि १४ एप्रिल रोजी डॉक्टर बाबाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. याच कारणामुळे ११ एप्रिल ते १४ एप्रिल या चार दिवसांत देशात लसीकरणाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. जास्तीत जास्त पात्र नागरिकांचे लसीकरण १४ एप्रिलपर्यंत पूर्ण करुन घ्यावे; असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी बैठकीला उपस्थित मुख्यमंत्र्यांना केले. 

महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. आणखी काही राज्यांमध्ये लवकरच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे लसीकरण आणि कोरोना चाचण्या या दोन्हीचा वेग वाढवणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

नाइट कर्फ्यू अर्थात रात्रीच्या संचारबंदीला कोरोना कर्फ्यू किंवा कोरोना संचारबंदी असे म्हणा. यामुळे नागरिकांमध्ये कोरोना पुन्हा पसरत असल्याची जाणीव निर्माण होईल. ज्यांनी कोविड प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष केले आहे त्यांनी पुन्हा एकदा कोविड प्रोटोकॉल पाळणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी