लॉकडाऊनबाबत उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींची बैठक

पंतप्रधान नरेंद्र नोदी हे देशातील सर्वा मुख्यमंत्र्यांशी उद्या (११ मे) चर्चा करणार आहेत. यावेळी लॉकडाऊनबाबत चर्चा करण्यात येणार आहे. 

pm modi to hold meeting with chief ministers again tomorrow on lockdown
लॉकडाऊनबाबत उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींची बैठक  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्र्याशी साधणार संवाद
  • मुख्यमंत्र्यांशी लॉकडाऊनबाबत पंतप्रधान मोदी करणार चर्चा
  • लॉकडाऊनबाबत महत्त्वपूर्ण निर्णय उद्याच्या बैठकीत होण्याची शक्यता

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या संसर्गाला रोखण्यासाठी देशात साधारण गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन ३.० हा १७ मे पर्यंत लागू असणार आहे. पण यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनबाबत नेमका काय निर्णय घ्यायचा याविषयी आता पंतप्रधान मोधी पुन्हा एकदा सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या (सोमवार) सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहे. 

लॉकडाऊन संदर्भात पुढील रणनीती यावर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणारी बैठक दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. यावेळी, पंतप्रधान मोदी हे विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही कोरोना व्हायरसचे वाढते रुग्ण आणि त्याला सामोरे जाण्यासाठीचे प्रयत्न यावर चर्चा करतील.

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदींनी चर्चा करण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत चार वेळा बैठक केली आहे. २० मार्च रोजी त्यांनी कोरोना व्हायरसबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली होती. या बैठकीनंतर २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. यानंतर २ एप्रिल, ११ एप्रिल आणि २७ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली होती. आता पुन्हा एकदा त्याच स्वरुपात पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. मात्र, यावेळी ते काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. 

भारतात आतापर्यंत २१०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार देशभरात गेल्या २४ तासात तब्बल ३२७७ नवे रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच आता देशात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा ६२ हजारांच्या देखील पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण ६२९३९ रुग्ण समोर आले आहेत. त्यापैकी २१०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी