अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर उभारणार, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना

लोकल ते ग्लोबल
Updated Feb 05, 2020 | 12:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

अयोध्येत राम मंदिराची निर्मिती लवकरच सुरू होणार असून त्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली.

PM Narendra Modi announced trust for Ram mandir in ayodhya
अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर उभारणार, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राम मंदिर निर्मितीबाबत निवेदन करताना महत्त्वाची घोषणा केली आहे.
  • श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली.
  • . हे ट्रस्ट स्वायत्तपणे काम करणार आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राम मंदिर निर्मितीबाबत निवेदन करताना महत्त्वाची घोषणा केली आहे. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती लवकरच सुरू होणार असून त्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. हे ट्रस्ट स्वायत्तपणे काम करणार असून भव्य आणि दिव्य अशा राम मंदिराच्या निर्माणासाठी या ट्रस्टकडे ६७ एकर जमीन हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहितीदेखील यावेळी पंतप्रधानांनी दिली.

भारताच्या ऑक्सिजनमध्ये, आदर्शांमध्ये आणि मर्यादांमध्ये भगवान श्रीराम आहेत, तसेच अयोध्येचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे हे आपण सर्वजण जाणतोच असे सांगत अयोध्येत भगवान श्रीराम यांच्या भव्य मंदिराच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. वर्तमान आणि भविष्यात रामलल्लाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या आणि त्यांची श्रद्धा पाहूनच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. अयोध्या कायद्याअंतर्गत अधिग्रहण केलेली सर्व ६७ एकर जमीन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राम मंदिर निर्माणाबाबतचा हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. माझ्या सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, श्रीराम जन्मस्थळावर भव्य दिव्य असे राम मंदिर उभारण्याबाबत एक विशाल योजना तयार केली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एका स्वायत्त ट्रस्ट असलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राची स्थापना करण्यात आल्याची माहिती मोदींनी यावेळी दिली.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या कामाबाबत निर्णय घएण्यास स्वायत्त असेल असे पंतप्रधान म्हणाले. सखोल विचार करून तसेच चर्चेशेवटी ५ एकर जागा सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याची विनंतीही उत्तर प्रदेश सरकारला करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी लोकसभेत दिली. यावेळी भारतात राहणारे हिंदू असो, मुस्लीम असो, शीख, इसाई, बौद्ध, पारसी किंवा मग जैन असो, हे सर्व एकाच कुटुंबाचे सदस्य आहेत असे मोदी म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी