Mann Ki Baat : UPI ही अर्थव्यवस्थेचा आणि सवयींचा भाग झाला आहे, मन की बातमधून पंतप्रधान मोदींकडून डिजिटल व्यवहाराचे कौतुक

युपीआयचा वापर फक्त दिल्लीतच नव्हे तर ग्रामीण भागातही वाढला आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून दिली. तसेच UPI ही अर्थव्यवस्थेचा आणि सवयींचा भाग झाला आहे, डिजिटल अर्थव्यवस्थेमधूनही देशात एक वेगळी संस्कृती आकार घेत आहे असेही मोदी म्हणाले.

mann ki baat
मन की बात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • युपीआयचा वापर फक्त दिल्लीतच नव्हे तर ग्रामीण भागातही वाढला आहे
  • UPI ही अर्थव्यवस्थेचा आणि सवयींचा भाग झाला आहे.
  • डिजिटल अर्थव्यवस्थेमधूनही देशात एक वेगळी संस्कृती आकार घेत आहे

PM Mann ki Baat : नवी दिल्ली : युपीआयचा वापर फक्त दिल्लीतच नव्हे तर ग्रामीण भागातही वाढला आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून दिली. तसेच UPI ही अर्थव्यवस्थेचा आणि सवयींचा भाग झाला आहे, डिजिटल अर्थव्यवस्थेमधूनही देशात एक वेगळी संस्कृती आकार घेत आहे असेही मोदी म्हणाले. (pm narendra modi applauded upi digital payment in mann ki baat programme)

मन की बात मध्ये पंतप्रधान म्हणाले की,  कल्पना करा की एखादी व्यक्ती, आपण दिवसभर संपूर्ण शहरात फिरू आणि एकाही पैशाचा व्यवहार रोखीने करणार नाही, असा संकल्प करून आपल्या घरातून बाहेर पडेल. किती वेगळा संकल्प आहे ना हा? सागरिका आणि प्रेक्षा या दिल्लीतल्या दोन मुलींनी असाच कॅशलेस डे आऊटचा प्रयोग केला. सागरिका आणि प्रेक्षा दिल्लीत जिथे जिथे गेल्या, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना डिजिटल पेमेंटची सुविधा मिळाली. UPI QR कोडमुळे त्यांना पैसे काढण्याची गरजच भासली नाही. अगदी रस्त्यावरचे खाद्यपदार्थ आणि फिरत्या विक्रेत्यांकडेही त्यांनी ऑनलाइन व्यवहार सहज करता आले असे मोदी म्हणाले. 

तसेच  एखाद्याला वाटेल की दिल्ली हे महानगर आहे, तिथे हे अगदी सहज शक्य आहे. पण आता UPI चा वापर फक्त दिल्लीसारख्या मोठ्या शहरांपुरताच मर्यादित असावा, अशी परिस्थिती नाही. गाझियाबादहून आनंदिता त्रिपाठी यांचाही एक संदेश मला मिळाला आहे. आनंदिता गेल्याच आठवड्यात आपल्या पतीसोबत ईशान्य भागात गेल्या होत्या. आसाम ते मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातील तवांग पर्यंतच्या आपल्या प्रवासाचा अनुभव त्यांनी मला सांगितला. कित्येक दिवसांच्या या प्रवासात त्यांना अगदी दुर्गम भागातही पैसे देण्याची गरज भासली नाही, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ज्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी इंटरनेटचीही चांगली सुविधा नव्हती, तिथे आता UPI द्वारे पैसे भरण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे. सागरिका, प्रेक्षा आणि आनंदिता यांचे अनुभव पाहता, मी तुम्हालाही कॅशलेस डे आऊटचा प्रयोग करून पाहण्याची विनंती करेन, तुम्ही हे नक्की करून बघा असे आवाहनही मोदी यांनी केले. 

पंतप्रधान मोदी म्हणाले की,  गेल्या काही वर्षात भीम UPI हा अगदी झपाट्याने आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि सवयींचा एक भाग बनला आहे. आता छोट्या शहरांमध्ये आणि बहुतेक गावांमध्येही लोक UPI च्या माध्यमातूनच व्यवहार करत आहेत. डिजिटल अर्थव्यवस्थेमधूनही देशात एक वेगळी संस्कृती आकार घेत आहे. गल्लीबोळातल्या छोट्या दुकानांमध्ये डिजिटल पेमेंटमुळे अधिकाधिक ग्राहकांना सेवा देणे सोपे झाले आहे. आता त्यांना सुट्ट्या पैशाचीही समस्या राहिली नाही. रोजच्या जगण्यात तुम्हाला सुद्धा UPI ची सोय जाणवली असेल. कुठेही जा, रोख पैसे बाळगण्याचा, त्यासाठी बँकेत जाण्याचा, एटीएम शोधण्याचा त्रास संपला आहे. मोबाईलवरूनच सगळे व्यवहार केले जातात.परंतु या लहान-सहान ऑनलाईन पेमेंटमुळे देशात किती मोठी डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? आजघडीला आपल्या देशात दररोज सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे व्यवहार होत आहेत. गेल्या मार्च महिन्यात तर यूपीआयच्या माध्यमातून 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे व्यवहार झाले. यामुळे देशात सुविधा वाढत असून, प्रामाणिकपणाचे वातावरणही निर्माण होते आहे. आता फिन-टेकशी संबंधित अनेक नवीन स्टार्टअप्सही देशात पुढे येत आहेत असेही मोदी यावेळी म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी