पंतप्रधान मोदी आज पुन्हा देशाला संबोधित करणार, पाहा किती वाजता बोलणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार

pm narendra modi to address the nation at 8 pm today
पंतप्रधान मोदी आज पुन्हा देशाला संबोधित करणार, पाहा किती वाजता बोलणार   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार
  • लॉकडाऊन ४.० बाबत बोलू शकतात पंतप्रधान
  • १७ मे रोजी संपणार लॉकडाऊन ३.० 

नवी दिल्ली: कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या लढाई दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (मंगळवार) पुन्हा देशाला संबोधित करणार आहेत. आज रात्री ८ वाजता पंतप्रधान देशाला संबोधित करणार आहेत. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा हा १७ मे रोजी संपणार आहे. अशावेळी संपूर्ण देशाचं लक्ष पंतप्रधान मोदींच्या संबोधनाकडे लागून राहिलं आहे. देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊन पुढे देखील वाढविण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

देशातील लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढविला जाऊ शकतो. सध्या सुरु असलेला लॉकडाऊन हा १७ मेपर्यंत आहे. पण यात पुन्हा एकदा वाढ केली जाऊ शकते. असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावरून मिळत आहेत. पंतप्रधान मोदींनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी दीर्घ चर्चा केली. यावेळी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान या मुद्द्यावरही चर्चा झाली. यावेळी मोदींनी राज्यांना ब्लू प्रिंट सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. 

या बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात पंतप्रधान मोदी म्हणाले की, लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात जीव आवश्यक पावलं उचलणं गरजेची होती ती दुसऱ्या टप्प्यात राहिली नाही. तसंच तिसर्‍या टप्प्यात आवश्यक असलेल्या गोष्टींची गरज चौथ्या टप्प्यात भासणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरून असा अंदाज वर्तवला जात आहे की, या लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा वाढ केली जाईल. परंतु त्यात इतर अनेक सवलती देण्यात येतील. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी १५ मे पर्यंत विविध राज्यांकडून सूचना मागविल्या आहेत.

देशातील कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरु करण्यात आला होता. जो आधी १४ एप्रिल, नंतर ३ मे आणि त्यानंतर १७ मेपर्यंत वाढविण्यात आला होता. भविष्यातील रणनीति ठरविताना विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, याक्षणी देशासमोर दोन मोठी आव्हाने आहेत. पहिलं आव्हान म्हणजे रोगावर नियंत्रण मिळवणं आणि दुसरं आव्हान म्हणजे मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून सार्वजनिक व्यवहाराता वाढ करणं 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी