Self Kidnapping : स्वतःच्याच अपहरणाचा डाव रचणाऱ्या दिल्ली तरुणीला वेगाने शोधून काढत पोलिसांनी हा डाव हाणून पाडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही तरुणी भारतात राहत होती. तिचा व्हिसा एक्सपायर झाला होता. आपल्या आईवडिलांकडून अधिक पैसे मिळवण्यासाठी तिने अपहरणाचा प्लॅन आखला. आपल्या नायजेरियन बॉयफ्रेंडसोबत तिने हा प्लॅन प्रत्यक्षात आणला आणि अपहरणाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. यामुळे दिल्ली पोलिसांसह अमेरिकी दूतावासातदेखील खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला.
क्लो रेनी नावाची 23 वर्षांची अमेरिकी तरुणी 3 मे रोजी भारतात आली होती. भारतातील अनेक ठिकाणं ती फिरली आणि त्यानंतर पुन्हा दिल्लीत आली. 9 जुलै रोजी तिने अमेरिकी नागरिक सेवाला एक ईमेल लिहिला. भारतात आपलं लैंगिक शोषण झालं असून आपल्याला मारहाण करण्यात आल्याची तक्रार या ईमेलमधून तिने केली होती. त्यानंतर 10 जुलै रोजी तिने आपल्या आईला व्हॉट्सअप कॉल केला आणि आपण कसे संकटात आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र अगोदरच ठरल्याप्रमाणे एकाने हा कॉल मध्येच कट केला. त्यामुळे तिच्या आईची चिंता वाढली आणि तिने अमेरिकी दूतावासात याबाबत तक्रार केली.
अधिक वाचा - मुसळधार पावसाचा कहर; पुराच्या पाण्यात नदीवरील पूल ओलांडणारी स्कूल बस गेली वाहून, LIVE VIDEO आला समोर
अमेरिकी दूतावासाकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी वेगवान हालचाली केल्या. इमिग्रेशन विभागात तिने नोंदवलेला पत्ता पोलिसांनी मागवून घेतला. मात्र प्रत्यक्ष त्या पत्त्यावर रेडिसन ब्लू नावाचं हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये ही तरुणी आलीच नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर व्हॉट्सअप कॉल करण्यासाठी तिने जे इंटरनेट वापरलं होतं, त्याचा आयपी ॲड्रेस पोलिसांनी शोधला. हा ॲड्रेस त्यांनी सर्व्हिलांसवर टाकून ठेवला. लवकरच पोलिसांना त्या आयडीशी संबंधित मोबाईल नंबर मिळाला. त्याच्या लोकेशनवरून पोलीस एका नायजेरियन तरुणापाशी पोहोचले.
या तरुणाकडे कसून चौकशी केली असता ही तरुणी ग्रेटर नोएडातील इम्पेरिया रेसिडन्सीमध्ये राहत असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेत तरुणीला ताब्यात घेतलं.
आपणच आपल्या अपहरणाचा बनाव रचला होता, अशी कबुली तरुणीने दिली आहे. आपला व्हिसा एक्सपायर झाला होता आणि आपल्याकडील पैसेदेखील संपत आले होते. त्यामुळे आईवडिलांकडून अधिक पैसे उकळता यावेत, यासाठी आपणच आपल्या अपहरणाचा बनाव रचल्याचं तिने सांगितलं. आईला व्हॉट्सअप कॉल करण्यासाठी आपल्या नायजेरियन बॉयफ्रेंडच्या मोबाईलचं वाय फाय कनेक्शन वापरल्याचंही तिने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी सध्या अमेरिकन तरुणी आणि तिच्या नायजेरियन बॉयफ्रेंडला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.