कोरोना लसीकरणावरुन रंगले राजकारण

देशातील एकूण कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ५७ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. पण राजकारण्यांना कुरघोडीचे राजकारण करण्यातून उसंत घ्यावीशी वाटत नाही.

politics over covid19 vaccination
कोरोना लसीकरणावरुन रंगले राजकारण 

थोडं पण कामाचं

  • कोरोना लसीकरणावरुन रंगले राजकारण
  • महाराष्ट्र सरकार विरुद्ध केंद्र सरकार
  • केंद्रीय मंत्र्यांनी दिली आकडेवारी

मुंबईः देशातील एकूण कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ५७ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. हे संकट आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टर आणि मेडिकल स्टाफ प्रयत्न करत आहे. पण राजकारण्यांना कुरघोडीचे राजकारण करण्यातून उसंत घ्यावीशी वाटत नाही, असे चित्र आहे. politics over covid19 vaccination

महाराष्ट्रातले कोरोना संकट गंभीर होत आहे. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारचा अघोषीत लॉकडाऊनवर आणि लसीकरणासाठी केंद्राकडून पुरेशी सहकार्य मिळत असा आरोप करण्यावर भर दिसत आहे. तर केंद्राकडून राज्य सरकारच्या आरोपांना आकडेवारीच्या स्वरुपात उत्तर दिले जात आहे. 

निर्बंध ठाकरे सरकारने जाहीर केले आहेत. व्यापारी संघटना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत. फडणवीस मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अघोषीत लॉकडाऊन करण्याऐवजी जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचे आवाहन करत आहेत. 

कोरोना लसीकरणात देशात आघाडीवर असल्याचा दावा राज्य सरकार करत आहे. पण एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला तरी देशातील बहुसंख्य कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आजही महाराष्ट्रातच का?, या प्रश्नाचे उत्तर ठाकरे सरकारने दिलेले नाही. 

मुख्यमंत्र्यांनी अलिकडेच केलेल्या फेसबुक लाइव्हच्या निमित्ताने राज्याची वैद्यकीय क्षमता अपुरी पडत असल्याचे सूतोवाच केले आहे. तर पुरवलेल्या मदतीचा वेळेवर सुयोग्य वापर होत नसल्याची आकडेवारी केंद्रीय मंत्र्यांकडून जाहीर झाली आहे. हे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण कोरोना संकट वाढत असताना आणखी तीव्र झाल्याचे चित्र आहे. 

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आज प्रसारमाध्यमांना वेळ दिला. याच सुमारास राज्य शासनाने अधिकृतरित्या केंद्राशी संवाद साधावा असा टोमणा फडणवीस यांनी मारला. यावर सरकारकडून प्रतिक्रिया देणे टाळले गेले. दिवसाची अखेर केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या एका ट्वीटने झाली. या ट्वीटनंतर राज्य शासनाकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

जावडेकर यांनी केंद्र सरकारच्यावतीने आकडेवारी जाहीर केली. महाराष्ट्राला आतापर्यंत लसच्या १ कोटी ६ लाख १९ हजार १९० बाटल्या पुरवण्यात आल्या. यातील ९० लाख ५३ हजार ५२३ बाटल्यांच्या वापर करण्यात आला. यातही सहा टक्के म्हणजे सुमारे पाच लाख बाटल्या एवढी लस महाराष्ट्रात वाया गेली. या लसचा वापर नाही झाला. केंद्राकडून महाराष्ट्राला आणखी ७ लाख ४३ हजार २८० लसच्या बाटल्या मिळणार आहेत. यामुळे राज्यात लसचे २३ लाख डोस देण्याची क्षमता उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रात दररोज होणारे सरासरी लसीकरण विचारात घेतले तर पुढील काही दिवस ही लस पुरू शकते. जावडेकर यांच्या या ट्वीटला राज्य शासनाने आकडेवारीच्या स्वरुपात अद्याप उत्तर दिलेले नाही.

याआधी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही आकडेवारी देत महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये कोरोना संकट हाताळण्याच्या बाबतीत हलगर्जीपणा सुरू असल्याचा आरोप केला. दोन राज्यांमुळे देशातील कोरोना संकट आणखी गंभीर होत असल्याचे ते म्हणाले. छत्तीसगड सरकारचा भर अँटीजेन चाचण्यांवर आहे तर महाराष्ट्र सरकारने वर्ष उलटले तरी पुरेश्या आरोग्य सुविधा सज्ज केलेल्या नाही असा आरोप केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केला.

या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या धुमश्चक्रीत सामान्यांचे हाल होणे काही थांबलेले नाही. कोरोना संकट आणि कडक निर्बंधांच्या नावाखाली सुरू असलेल्या अघोषीत लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. परराज्यांतून आलेले अनेक कष्टकरी रोजच्या गोंधळाने त्रासले आहेत. काहींनी परतीची वाट धरली आहे. 

महाराष्ट्रात ५ लाखांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

महाराष्ट्र शासनाच्या आकडेवारीनुसार राज्यात ५ लाख १ हजार ५५९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील २४ तासांत राज्यात ५९ हजार ९०७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दर दोन-तीन दिवसांत राज्यात लाखभर कोरोना रुग्णांची भर पडत आहे. राज्यात अचानक कोरोना रुग्ण वाढण्याचे कारण काय? या अपयशासाठी कोणत्या सरकारला जबाबदार धरावे याचे उत्तर राज्य शासनाने दिलेले नाही. विशेष म्हणजे राज्य शासन लसीकरणाच्या मुद्यावर केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी आपणच केलेल्या वक्तव्यापैकी एकही वक्तव्य स्वतःच्या ट्विटर हँडलवरुन प्रसिद्ध करणे टाळले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी