इस्लामाबाद: कोळशाच्या अभावामुळे भारतावर विजेचं संकट निर्माण झालं होतं. आता आपल्या शेजारील देश पाकिस्तानातही (Pakistan) विजेचं संकट आले असून वीज वाचवण्यासाठी तेथील सरकारने मोठा धक्कादायक निर्यण घेतला आहे. पाकिस्तान सरकारने (Government of Pakistan) वीज वाचवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, इस्लामाबाद (Islamabad) शहरात रात्री 10 नंतर लग्नाच्या कार्यक्रमांवर (wedding events) बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. याशिवाय रात्री 8:30 वाजता देशभरातील बाजारपेठादेखील (Market)बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली.
'जिओ न्यूज'च्या वृत्तानुसार, वीज संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने विजेचा वापर कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. आणि आता इस्लामाबादमध्ये रात्री 10 नंतर लग्न समारंभांवर बंदी असणार असून हा नियम 8 जूनपासून लागू झाला आहे. सध्याच्या वीज संकटाचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे, त्यामुळे राष्ट्रीय आर्थिक परिषद (NEC) ने देशभरातील बाजारपेठा (स्थानिक वेळेनुसार) रात्री 8.30 वाजता बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
वीज संकटाबाबत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री वगळता सर्व प्रांतांचे मुख्यमंत्र्यांनी भाग घेतला. या संदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंध, पंजाब आणि बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी व्यापारी संघटनेशी सल्लामसलत करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे, परंतु त्यांनी या निर्णयाला सहमती दर्शवली आहे.
पत्रकारांना संबोधित करताना उर्जा मंत्री खुर्रम दस्तगीर म्हणाले की बाजार लवकर बंद करणे आणि घरातून काम केल्याने विजेची बचत होऊ शकते. "देशातील वीज निर्मिती 22,000 MW आहे आणि गरज 26,000 MW आहे," मंत्री म्हणाले. ते म्हणाले की, देशात सुमारे चार हजार मेगावॅटचा तुटवडा आहे. दुसरीकडे, माहिती आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने सरकारी कार्यालयांमध्ये शनिवारची साप्ताहिक सुट्टी पूर्ववत करण्यास परवानगी दिली आहे. आता कर्मचारी शुक्रवारीही घरून काम करू शकतात. वीज संकटाचा सामना करण्याबाबतही मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचे ते म्हणाले. मात्र, वीज बचतीसाठी सायंकाळी ७ नंतर बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला नाही.