बंगालची निवडणूक जिंकूनसुद्धा, प्रशांत किशोर सोडणार इलेक्शन मॅनेजमेंटचे काम, जाणून घ्या कारण

लोकल ते ग्लोबल
Updated May 02, 2021 | 17:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

प्रशांत किशोर यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आपण निवडणूक व्यवस्थापनाच्या कामातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगितले. यापुढे ते कोणत्याही पक्षासाठी निवडणूक व्यवस्थापक काम करणार नाहीत.

Prashant Kishor decides to retire
प्रशांत किशोर होणार निवृत्त 

थोडं पण कामाचं

  • प्रशांत किशोर होणार निवृत्त
  • निवडणूक आयोगावर कडक टीका
  • कुटुंबासोबत घालवणार वेळ

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसचे निवडणूक सल्लागार आणि व्यवस्थापक असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor)यांनी रविवारी धक्कादायक निर्णय जाहीर केला. 

निवृत्त होण्याचा प्रशांत किशोर यांचा निर्णय


प्रशांत किशोर यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आपण निवडणूक व्यवस्थापनाच्या कामातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगितले. यापुढे ते कोणत्याही पक्षासाठी निवडणूक व्यवस्थापक किंवा सल्लागाराचे काम करणार नाहीत. पीके या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रशांत किशोर यांनी प. बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल निर्णायक टप्प्यावर आल्यावर हा निर्णय जाहीर केला आहे. आपण यापुढे आणखी काही करू इच्छितो, असेही ते म्हणाले.

निवडणूक आयोगावर टीका


आपण निवडणूक व्यवस्थापनाचे काम सोडत आहोत असे जाहीर करत प्रशांत किशोर यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आणि निवडणूक आयोग हा भाजपचाच विस्तार असल्याचा आरोपदेखील केला. 

मी आतापर्यत कधीही अंशत: निवडणूक आयोग (Election Commission) पाहिलेला नाही. सध्याच्या निवडणूक आयोगाने भाजपला मदत करण्यासाठी सर्वकाही केले. धर्माचा निवडणूक प्रचारातील वापर ते मतदानाच्या कार्यक्रमापर्यत निवडणूक आयोगाने भाजपला मदत करण्यासाठी सर्वकाही केले. सध्या परिस्थिती अशी आहे की निवडणूक आयोग हा भाजपचाच एक भाग झाला आहे, अशा शब्दात प्रशांत किशोर यांनी निवडणूक आयोगावर टीका केली.

 

हीच निवृत्त होण्याची वेळ


टीएमसीने प. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत जोरदार विजय मिळवलेला असतानाही प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनितीकाराच्या कामातून निवृत्त होण्याचा घेतलेला निर्णय यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मी बऱ्याच दिवसांपासून हे काम सोडण्याचा विचार करत होतो आणि त्यासाठीची मी संधी शोधत होतो. प. बंगालमधील निवडणुकीने ही संधी मला दिली, असे प्रशांत किशोर म्हणाले. त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेविषयी विचारले असता ते म्हणाले, तुम्ही राजकीय जीवनात असता तेव्हा सर्वांचेच तुमच्यावर लक्ष असते. मी या क्षेत्रात होतो आणि मला अपयशदेखील आले. शांतपणे बसून मी सर्व गोष्टींचे पुनरावलोकन करत आपण अधिक काय चांगले करू शकतो याचा विचार करण्याची मला आवश्यकता आहे.

मी माझ्या कामाची सूत्रे ज्यांनी माझ्यासोबत काम केले त्यांच्याकडे दिली पाहिजेत. प्रत्यक्ष काम माझ्या सहकाऱ्यांनीच केले आहे. त्यांच्याकडे माझ्या कामाची सूत्रे देण्यासाठी याच्याइतकी योग्य वेळ नसती, असे पुढे प्रशांत किशोर म्हणाले. आपण या कामातील निवृत्तीचा आनंद घेणार आहोत आणि माझ्या कुटुंबियांसोबत वेळ घालवणार आहोत, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.

कुटुंबासोबत घालवणार वेळ

प्रशांत किशोर हे निवडणूक व्यवस्थापनात निष्णात समजले जातात. अनेक पक्षांनी आणि अनेक राज्यांतील प्रादेशिक पक्षांनी त्यांना निवडणुकांच्या काळात नियुक्त केले होते. विधानसभा आणि लोकसभ निवडणुकांमध्ये प्रशांत किशोर यांनी आपला ठसा उमटवला होता. प्रशांत किशोर यांनी डिसेंबरमध्ये दावा केला होता की भाजप प. बंगालमध्ये १००चा आकडा पार करू शकणार नाही. जर असे झाले तर ते निवडणूक व्यवस्थापनाचा पेशा सोडतील. प. बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या टीएमसीला दणदणीत विजय मिळाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी