Presidential Elections : देशाचे प्रथम नागरिक होण्याचा बहुमान कुणाला मिळणार, हे ठरवण्यासाठी राष्ट्रपतीपदाची निवडणूक सोमवारी पार पडली. या निवडणुकीत मतदान नेमकं कसं झालं, हे बुधवारी निकाल लागल्यावर स्पष्ट होईलच. अनेकांनी या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा आहे. अनेकांनी पक्षाची भूमिका सोडून त्याविरोधात मतदान केल्याचंही सांगितलं जात आहे. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यातील ही निवडणूक कोण जिंकणार, हे बुधवारी समजेलच. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा आघाडी मिळवल्याचं दिसून येत असून विरोधकांचं मनोबल खच्ची करण्यात भाजपला यश आल्याची चर्चा आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यासारख्या नेत्यांचे डाव हाणून पाडत आपणच राजकारणातील चाणक्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा सिद्ध केल्याचं सांगितलं जात आहे.
एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मिळणाऱ्या मतांची संख्या साधारण 61 टक्के आहे. अर्थात, हा केवळ उघडपणे आणि जाहीररित्या मिळणाऱ्या मतांचा आकडा होता. प्रत्यक्ष मतदानावेळी क्रॉस व्होटिंग झालं असण्याची शक्यता असून त्यामुळे मुर्मू यांचं मताधिक्य अधिकच वाढेल, असा अंदाज आहे. एनडीएकडे स्वतःचं संख्याबळ हे 50 टक्क्यांपेक्षाही कमी होतं. मात्र मुर्मू यांच्या उमेदवारीनंतर अनेक पक्षांना आपल्याकडे खेचण्यात भाजपला यश मिळालं. त्यामध्ये बीजेडी, झारखंड मुक्ती मोर्चा, जनता जल सेक्युलर, टीडीपी, शिवसेना, बसपा आणि अकाली दल यासारख्या पक्षांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. हे पक्ष काही एनडीएचे घटक बनले नाहीत. मात्र आदिवासी नेत्या मुर्मू यांना उमेदवारी देण्याची पंतप्रधान मोदी यांची कल्पना मात्र त्यामुळे यशस्वी झाली.
अधिक वाचा - 'हे तर वासू-सपनाचं सरकार, अजून आपलं...', संजय राऊतांची अत्यंत बोचरी टीका
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी दिलेली प्रतिक्रिया फारच बोलकी ठरली. ते म्हणाले, “मी केवळ एक राजकीय लढाईच लढत नसून सरकारी संस्थांच्या कारभाराविरोधातही ही लढाई आहे. सध्या सरकारी संस्था राजकारणात फारच सक्रीय झाल्या असून पक्ष तोडण्या-फोडण्याचं कामही या संस्था करू लागल्या आहेत. लोकांनी एक विशिष्ट पक्षाच्या बाजूने मतदान करावं, यासाठी या संस्था कार्यरत झाल्या आहेत. हा सगळा पैशांचा खेळ सुरू आहे.” यशवंत सिन्हांनी एक प्रकारे आपला पराभव झाल्याचं या प्रतिक्रियेतून मान्य केलं असल्याची चर्चा आहे.
अधिक वाचा - Marburg virus : जगासमोर नवे संकट! घानामध्ये अत्यंत संसर्गजन्य मारबर्ग विषाणूचा उद्रेक...WHO कडून घोषणा
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे. आपण राष्ट्रपती निवडतो आहोत की एखादी मूर्ती बसवतो आहोत, असा सवाल त्यांनी केला आहे. आपल्याला एक सक्रीय राष्ट्रपती हवा आहे. आपल्या सर्व अधिकारांचा वापर करू शकणारा आणि देशाच्या सत्तेचा समतोल साधू शकेल, अशी व्यक्ती त्या पदावर बसणं गरजेचं आहे, असंंही ते म्हणाले. थोडक्यात, राष्ट्रीय राजकारणात स्पष्ट बहुमत नसतानाही आपण जिंकू शकतो, हे भाजपनं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे.