President Election 2022: नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोग आज दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. यादरम्यान राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली जाईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. त्यापूर्वी निवडणूक आयोग राष्ट्रपतीपदाची निवडणूक घेईल.
संविधानाच्या अनुच्छेद ६२ नुसार राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे पुढील राष्ट्रपती निवडण्यासाठीची निवडणूक त्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांव्यतिरिक्त, सर्व राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले आमदार, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमधील आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करू शकतात. राज्यसभा, लोकसभा किंवा विधानसभेच्या नामनिर्देशित सदस्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नाही.
त्याचप्रमाणे राज्यांच्या विधान परिषदेच्या सदस्यांनाही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार नाही. २०१७ मध्ये राष्ट्रपती निवडणुकीसाठी १७ जुलै रोजी मतदान झाले होते आणि २० जुलै रोजी मतमोजणी झाली होती.