पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी देशाला संबोधित करणार

prime minister narendra modi will address the nation at 4 pm on tuesday पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (मंगळवारी) संध्याकाळी ४ वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

prime minister narendra modi will address the nation at 4 pm on tuesday
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी देशाला संबोधित करणार 

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी संध्याकाळी ४ वाजता देशाला संबोधित करणार
  • पंतप्रधान कार्यालयाने दिली माहिती
  • कोरोना संकट आणि भारत-चीन तणाव या विषयांवर बोलण्याची शक्यता

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (मंगळवारी) संध्याकाळी ४ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान वाढत असलेले कोरोना संकट आणि भारत-चीन तणाव या दोन विषयांवर बोलण्याची शक्यता आहे.

भारतातले कोरोना संकट

आतापर्यंत देशात ५ लाख ६६ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात सध्या २ लाख १५ हजारांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जवळपास ९ हजार कोरोना रुग्णांची स्थिती गंभीर आहे. देशात साधारणपणे दर १ लाख नागरिकांपैकी ४११ जणांना कोरोना होत असल्याचे आढळत आहे. तसेच दर १ लाख जणांपैकी १२ जणांचा मृत्यू कोरोना झाल्यामुळे होत आहे. भारतामध्ये आतापर्यंत जवळपास ८४ लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत. सुरुवातीच्या काळात अचूक निष्कर्ष काढण्यासाठी अनेकांच्या एकपेक्षा जास्त कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण परिस्थिती चिंताजनक आहे. अनलॉक जाहीर झाला असूनही रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा लॉकडाऊन जाहीर करावा की करू नये यावर उलटसुलट चर्चा अनेक ठिकाणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी काय बोलतात, याकडे देशाचे लक्ष आहे.

भारत-चीन तणाव

कोरोना संकट तीव्र होत असतानाच चीनने लडाखमध्ये भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. यातून भारत आणि चीन यांच्यात प्राणघातक संघर्ष झाला. भारताचे कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवान हुतात्मा झाले. चीनच्या ४३ कॅज्युअल्टी झाल्याचा प्राथमिक अंदाज भारतीय सैन्याने व्यक्त केला. यानंतर भारत आणि चीन यांच्यात तणाव कायम आहे. संघर्ष झाला नसला तरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव आहे. संरक्षण तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक भारत-चीन तणावावर वेगवेगळी मते प्रदर्शित करत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सध्या कसे वातावरण आहे या संदर्भात पंतप्रधान सूतोवाच करण्याची शक्यता आहे.

चिनी अॅपवर बंदी

ज्या देशांच्या भौगोलिक सीमा भारताशी जोडलेल्या आहेत अशा देशांमधील एक किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणूकदारांना देशातील कोणत्याही प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी अथवा आधी केलेली गुंतवणूक आणखी वाढवण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने चीनच्या ५९ अॅपवर बंदी घातली आहे. यात टिकटॉक, शेअरइट, युसी ब्राउझर यांचा समावेश आहे. देशाच्या सुरक्षेसाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयासंदर्भात नागरिकांना सविस्तर माहिती देण्यासाठी तसेच भारत सरकारच्या पुढील निर्णयांविषयी संकेत देण्याकरिता पंतप्रधान मोदी मंगळवारी देशाला संबोधित करण्याची शक्यता काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने मात्र पंतप्रधान मोदी बोलतील हे जाहीर करण्याव्यतिरिक्त आणखी माहिती दिलेली नाही. पंतप्रधान नेमके कोणत्या विषयावर बोलणार आहेत हे नेहमीप्रमाणे गुप्त ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधान देशाला संबोधित करेपर्यंत त्यांच्या भाषणाविषयी तर्कवितर्क लढवणे सुरू राहणार असे चित्र आहे.

विरोधकांचेही पंतप्रधानांच्या भाषणाकडे लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी नोटाबंदी, लॉकडाऊन असे महत्त्वाचे निर्णय देशाला संबोधित करताना जाहीर केले आहेत. कोरोना योद्ध्यांसाठी घंटानाद अथवा थाळीनाद किंवा शंखनाद करा, कोरोना योद्ध्यांसाठी घराच्या खिडकीत अथवा गॅलरीत (बाल्कनी/सज्जा) दिवे लावा अशा स्वरुपाचे आवाहनही पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना केले आहे. 

पंतप्रधान मोदी यांच्या बोलण्यामुळे नागरिकांची तारांबळ उडते अशी विरोधकांची तक्रार आहे तर सरकारचे समर्थक पंतप्रधानांनी जनतेला विश्वासात घेऊन निर्णय जाहीर केला असे सांगतात. हा वाद सुरू असला तरी सरकारचे समर्थक आणि विरोधक अशा सर्वांचेच कायम पंतप्रधान मोदी काय बोलतात याकडे लक्ष असते. पंतप्रधानांच्या निर्णयाचे देशावर लगेच परिणाम दिसून येतात. त्यामुळे मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान काय बोलणार याविषयीची उत्सुकता वाढली आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी