PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा; वॉशिंग्टन विमानतळावर मोदींचं जंगी स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर (visit to US) आहेत.

Prime Minister Narendra Modi's visit to US
PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी अमिरेकी परराष्ट्र मंत्रालयाचे अनेक अधिकारी उपस्थित
  • या दौऱ्यात पीएम मोदी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करतील आणि क्वाड देशांच्या नेत्य़ाशी बैठक करतील.
  • मोदी आणि बायडन यांच्यात 24 सप्टेंबर रोजी द्विपक्षीय बैठक होईल.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर (visit to US) आहेत. भारतीय वेळेनुसार, मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Washington Dulles International Airport) दाखल झाले. विमानतळावर पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी अमिरेकी परराष्ट्र मंत्रालयाचे अनेक अधिकारी उपस्थित होते. यासह अमेरिकेतील भारतातील राजदूत तरणजीत सिंह संधूही विमानतळावर उपस्थित होते. 

आपल्या या दौऱ्यात पीएम मोदी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करतील आणि क्वाड देशांच्या नेत्य़ाशी बैठक करतील. याशिवाय, पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. दरम्यान, काल (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेसाठी रवाना झाले होते. अमेरिकेत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आता थेट पेंसिलवेनिया एवेन्यू येथील हॉटेल विलार्ड इंटरकॉन्टिनेंटलसाठी रवाना होणार आहेत.

तसेच अमेरिका दौऱ्यादरम्यान, मोदी याच हॉटेलमध्ये राहणार आहेत.  23 सप्टेंबर रोजी अमेरिकेतील वेळेनुसार, सकाळी 9.40 वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:15 वाजता) पंतप्रधान मोदी आपल्या हॉटेलमध्ये वेळवेगळ्या CEO सोबत भेटीगाठी करतील. यामध्ये क्वॉलकॉमचे अध्यक्ष आणि CEO, अॅडॉबचे चेअरमन, फर्स्ट सोलरचे CEO, जनरल अॅटॉमिक्सचे चेअरमन आणि CEO आणि ब्लॅकस्टोनचे संस्थापक यांचा सहभाग असेल. 

कसा असेल मोदींचा अमेरिका दौरा?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अमेरिका दौऱ्यात परराष्ट्र मंत्री, एनएसएसह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांची भेट घेणार आहेत. सोबतच क्वाड लीडर्स मीट आणि यूएनजीएसोबत पहिली बैठक देखील घेणार आहेत. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यातील कार्यक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी  बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आयोजित केलेल्या कोरोना कोरोना वैश्विक शिखर संमेलनात सहभागी होतील.  

 मोदी आणि बायडन यांच्यात 24 सप्टेंबर रोजी द्विपक्षीय बैठक होईल. या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि बायडन भारत-अमेरिकेतील संबंधांवर चर्चा करतील. तसेच या बैठकीत दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करणे, सुरक्षेसंबंधी तसेच स्वच्छ ऊर्जा भागिदारीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजीत डोभाल आणि विदेश सचिव श्रृंगला देखील असणार आहेत. 

महासभेलाही पंतप्रधान मोदी संबोधित करतील

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेलाही पंतप्रधान मोदी संबोधित करतील. 25 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभा असणार आहे.  संयुक्त राष्ट्र संघाच्या 76 व्या महासभेमध्ये अफगाणिस्तान, हवामान बदल आणि कोरोनाबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांची पहिल्यांदा भेट घेतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान मोदींना व्हाईट हाऊसला भेट देण्याचे औपचारिक निमंत्रण आधीच दिले आहे. याच बैठकीमध्ये अफगाणिस्तान आणि सीमाभागातील अन्य मुद्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. सीमापार दहशतवाद आणि कट्टरता यासारख्या मुद्द्यांवरही व्यापक चर्चा होण्याची शक्यता आहे. 

 'क्वाड' परिषदेत सहभागी होतील

बायडन यांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचीही भेट घेतील. सोबतच या दौऱ्यात क्वाड शिखर परिषद व्हाईट हाऊस येथे आयोजित केली जाईल. जिथे चार देशांच्या (अमेरिका , भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया) नेत्यांची प्रथमच प्रत्यक्ष बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदी क्वाड समिटमध्येही सहभागी होतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी