Bharat Jodo Yatra: राहुल गांधींना मिळाली बहीण प्रियंकाची साथ, मध्यप्रदेशातील सहभागामुळे ‘ही’ चर्चा सुरू

दक्षिणेकडील राज्यातील यात्रेदरम्यान न दिसलेल्या प्रियंका गांधी आता या यात्रेत सहभागी झाल्या आहेत. ही यात्रा महाराष्ट्रातून बाहेर पडेपर्यंत त्या यात्रेत सहभागी झाल्या नव्हत्या. मात्र आता मध्यप्रदेशातील यात्रेदरम्यान त्यांचा सहभाग दिसून आल्यामुळे राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

Bharat Jodo Yatra
राहुल गांधींना मिळाली बहीण प्रियंकाची साथ  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • भारत जोडो यात्रेत प्रियंका गांधी यांचा सहभाग
  • मध्यप्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पूर्वतयारीची चर्चा
  • राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका

Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा दक्षिणेतील आणि पश्चिमेतील राज्यांचा प्रवास संपवून आता उत्तरेत दाखल झाली आहे. भाजपशासित मध्यप्रदेशमध्ये (Madhya Pradesh) आता ही यात्रा पोहोचली आहे. 3570 किलोमीटरच्या या पदयात्रेत राहुल गांधी यांच्या बहीण प्रियंका गांधींनी सहभाग घेतला आणि राहुल यांच्यासोबत त्या काही अंतर चालल्या. मध्यप्रदेशमधील बोरगावमधून गुरुवारी ही यात्रा सुरू झाली असून दुपारी ती बडोदा अहीर या ठिकाणी पोहोचणार आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला एका आदिवासी सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. रात्री 8 वाजेपर्यत ही यात्रा सुरु राहणार असून त्यानंतर विश्रांतीसाठी ती थांबणार आहे.

प्रियंका गांधींचा सहभाग

दक्षिणेकडील राज्यातील यात्रेदरम्यान न दिसलेल्या प्रियंका गांधी आता या यात्रेत सहभागी झाल्या आहेत. ही यात्रा महाराष्ट्रातून बाहेर पडेपर्यंत त्या यात्रेत सहभागी झाल्या नव्हत्या. मात्र आता मध्यप्रदेशातील यात्रेदरम्यान त्यांचा सहभाग दिसून आल्यामुळे राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. मध्यप्रदेशात सध्या भाजपचं सरकार आहे. भाजपच्या ताब्यात असलेल्या काही जागा या एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होत्या. या जागा परत मिळवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसल्याची चर्चा आहे. राज्यात वातावरण निर्मिती करणे आणि भविष्यातील राजकीय गणितांची आखणी कऱणे हादेखील प्रियंका गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेतील सहभागामागचा उद्देश असल्याची चर्चा आहे. 

अधिक वाचा - बायकांवर नवऱ्याकडूनच लैंगिक किंवा शारीरिक अत्याचार, धक्कादायक आकडेवारीनं महिलांची वाढली चिंता

16 जागांवर नजर

पारंपरिकरित्या काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या 16 जागांवर सध्या भाजपने विजय संपादन केला आहे. या जागा परत मिळवणं काँग्रेसला तुलनेनं सोपं असल्याची चर्चा आहे. 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या 16 जागांचं महत्त्व काँग्रेसससाठी अनन्यसाधारण आहे. काँग्रेसने 2018 साली मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. मात्र कमलनाथ यांच्या नेतृ्वाखालील सरकार दोन वर्षात गडगडलं होतं. ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या नेतृत्वाखाली 20 पेक्षा अधिक आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर मध्यप्रदेशात भाजपचं सरकार अस्तित्वात आलं होतं. 

मोदी सरकारवर कडाडून टीका

मध्यप्रदेशमध्ये बुरहानपूर येथे बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. महागाई, अग्नीपथ योजनेतील त्रुटी आणि खासगीकरणाचे धोरण यावरून त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारसाठी नोटबंदी आणि जीएसटी ही धोरणं नव्हती, तर सर्वसामान्य व्यापारी आणि छोट्या उद्योजकांना संपविण्यासाठीचं हत्यार होतं, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. 

अधिक वाचा - तरुणाचं अपहरण करुन 4 तरुणींनी केला सामूहिक बलात्कार, तरुणाच्या दाव्याने खळबळ

चार वर्षात अग्निवीर बेरोजगार

भारत सरकार आणि सैनिक यांच्यात एक नातं होतं. मात्र अग्निवीर योजना आणून सरकारनं हे नातंच तोडून टाकल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. चार वर्षांच्या सेवेनंतर बहुतांश सैनिक बेरोजगार होणार असल्याच्या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी