सलग ६ तासांपासून खेळत होता पबजी, हृदयविकाराने झाला मृत्यू

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 01, 2019 | 11:36 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

PUBG: मध्य प्रदेशमध्ये सतत पबजी खेळल्याने एका मुलाचा मृत्यू झाला आहे. हा मुलगा ६ तासांपासून पबजी खेळत होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

pubg game
पबजी गेम  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: सध्या मुलांपासून ते तरुणांपर्यंत साऱ्यांनाच पबजी गेमने वेड लावले आहे. या पबजीमुळे मुले वेड्यासारखी त्या मोबाईलला चिकटलेली असतात. जणू काही मुलांना गेमचे व्यसनच लागले आहे. या व्यसनामुळे एका १६ वर्षीय मुलाने आपला जीव गमावल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. या गेमच्या व्यसनापायी मुलांचे हकनाक जीव जाऊ लागले आहेत. मुलांना मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मोबाईलवर गेम खेळणेच अधिक आवडीचे वाटू लागले आहेत. तसेच सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने मुले सतत तासनंतास मोबाईलमध्ये गेमसाठी डोके खुपसून बसलेली दिसतात. 

मोबाईल फोनवर सलग ६ तास पजबी खेळणे आणि त्यात पराभव झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. मृत मुलाचे वडील हारून कुरेशी यांनी शुक्रवारी सांगितले, त्यांचा मुलगा फुरकान २६ मेला रात्री दोन वाजेपर्यंत पबजी गेम खेळत होता. त्यानंतर २७ मेला सकाळी उठून तो सहा तास हा गेम खेळत होता. त्यानंतर ब्लास्ट कर, ब्लास्ट कर असे तो ओरडू लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. 

फुरकान खूपच सक्रिय मुलगा होता. अजमेरच्या जवळील नसीराबाद येथे कुरेशी राहतात. कुरेशी कुटुंबीय नीमच येथे एका सोहळ्यासाठी गेले असताना ही घटना घडली. नीमचचे हृदयरोगतज्ञ डॉ. अशोक जैन म्हणाले, हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला नर्सिंग होममध्ये आणण्यात आले मात्र येथे येण्याआधीच त्याच्या हृदयाचे ठोके बंद झाला होते. 

ते पुढे म्हणाले, त्यानंतर मुलाला इलेक्ट्रिक शॉक देण्यात आला तसेच हृदयाचे पम्पिंग सुरू करण्यासाठी इंजेक्शनही देण्यात आले मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुबियांनी याप्रकरणी पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही की मुलाचा मृत्यू एखाद्या गेममुले झाला. यामुळेच याप्रकरणी पोलीस कोणताही तपास करत नाही आहे. 

हृदयरोग तज्ञ डॉ. विपुल गर्ग म्हणाले, गेम खेळता खेळता मुले त्या गेमशी जोडले जातात आणि त्या आवेशामध्ये ते अनेकदा हृदयरोगाची शिकार होतात. डॉ. गर्ग म्हणाले मुलांनी अशा गेमपासून दूर राहिले पाहिजे. 
 
नेपाळमध्ये पबजीवर बंदी

पबजीमुळे अनेक दुर्घटना घडत असताना  नेपाळमध्ये या गेमवर बंदी घालण्यात आली आहे. कोर्टाने आदेश दिल्यानंतर ही बंदी घालण्यात आली. तरूण तसेच मुलांवर याचा वाईट परिणाम होत आहे. त्यामुळेच ही बंदी घालण्यात आल्याचे कोर्टाने यावेळी स्पष्ट केले

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी