राहुल गांधीच्या दौऱ्याआधी पुदुचेरीत काँग्रेस सरकार अल्पमतात

puducherry narayanasamy govt loses majority काँग्रेस खासदार राहुल गांधी १७ फेब्रुवारी रोजी पुदुचेरीचा दौरा करणार असे जाहीर झाले आणि राजकारणाला वेग आला.

puducherry narayanasamy govt loses majority
राहुल गांधीच्या दौऱ्याआधी पुदुचेरीत काँग्रेस सरकार अल्पमतात 

थोडं पण कामाचं

  • राहुल गांधीच्या दौऱ्याआधी पुदुचेरीत काँग्रेस सरकार अल्पमतात
  • कामराजनगरचे काँग्रेस आमदार ए जॉन कुमार यांनी दिला राजीनामा
  • आतापर्यंत ४ काँग्रेस आमदारांनी दिला राजीनामा

नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी १७ फेब्रुवारी रोजी पुदुचेरीचा दौरा करणार असे जाहीर झाले आणि राजकारणाला वेग आला. कामराजनगरचे काँग्रेस आमदार ए जॉन कुमार यांनी राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे राजीनामा देणाऱ्या काँग्रेस आमदारांची संख्या चार झाली आणि पुदुचेरीतले काँग्रेस सरकार अल्पमतात आले. विधानसभेत बहुमतासाठी १५ सदस्यांची आवश्यकता असताना सत्ताधारी गटाकडे १४ आमदारांचा पाठिंबा आहे. यातही एक विधानसभेचे अध्यक्ष आहेत. (puducherry narayanasamy govt loses majority)

मतदानाच्या वेळी विधानसभाध्यक्षांना तटस्थ राहून मतदानाची प्रक्रिया राबवावी लागते. समर्थन आणि विरोध करणारी मते समसमान असतील तर निर्णायक मत देण्याचा अधिकार विधानसभाध्यक्षांना असतो. एरवी ते मतदानात सहभागी होऊ शकत नाहीत. या तरतुदीमुळे १४ आमदार असूनही सत्ताधारी गटाला बहुमत सिद्ध करणे कठीण असल्याचे चित्र आहे. पण मुख्यमंत्री नारायणसामी यांनी सरकार बहुमतात असल्याचा दावा केला आहे. 

ताज्या घडामोडीमुळे पुदुचेरी या विधानसभा असलेल्या केंद्रशासीत प्रदेशात काँग्रेस आणि भाजप यांच्यात शहकाटशहचे राजकारण रंगण्याची चिन्ह दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा पुदुचेरीच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि निवडणूक जिंकून बहुमताने सत्ता स्थापन करू, असा दावा केला होता. यानंतर पुदुचेरीत राजकीय हालचालींना वेग आला. 

महिन्याभरात काँग्रेसच्या चार आमदारांचे राजीनामे सादर झाले आणि एका आमदाराला अपात्र ठरवण्यात आले. यामुळे आधी १५ आमदार असलेल्या काँग्रेसकडे पुदुचेरीत १० आमदार उरले आहेत. काँग्रेसच्या १० आमदारांपैकी एक विधानसभेचे अध्यक्ष आहेत. द्रमुकच्या (डीएमके) तीन आणि एका अपक्ष आमदाराचा सत्ताधारी काँग्रेसला आधीपासूनच पाठिंबा आहे. यामुळे सध्या सत्ताधारी गटाकडे १४ आमदारांचा पाठिंबा आहे पण बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तर १३ सदस्यांनाच मतदान करता येणार आहे. याउलट विरोधी गटाकडे सध्या १४ आमदार आहेत. यात माजी मुख्यमंत्री रंगस्वामी यांच्या ऑल इंडिया एन. आर. काँग्रेसचे ७, अण्णाद्रमुकचे (एआयएडीएमके) ४ आणि भाजपचे मतदानाचा अधिकार असलेले तीन नामनिर्देशीत आमदार आहेत. 

नायब राज्यपाल किरण बेदींना माघारी बोलावले

काँग्रेसच्या चौथ्या आमदाराचा राजीनामा सादर झाल्यानंतर काही तासांतच नायब राज्यपाल किरण बेदी यांना माघारी बोलावण्याचा निर्णय राष्ट्रपतींनी घेतला. राष्ट्रपती कार्यालयाने एक पत्रक काढून तेलंगणाचे राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांच्याकडे पुदुचेरीचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. याआधी पाच दिवसांपूर्वी नायब राज्यपाल किरण बेदी यांनी पुदुचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांना पत्र लिहिले होते. या पत्रामुळे नाराज झालेल्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली होती. यानंतर राष्ट्रपतींनी नायब राज्यपाल किरण बेदी यांना परत बोलावले. पण नायब राज्यपालांच्या बाबतीतला निर्णय काँग्रेसची कोंडी करणारा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पुदुचेरीत लवकरच निवडणुका

पुदुचेरीच्या विधानसभेचा कार्यकाळ २१ जून २०२१ रोजी संपणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात पुदुचेरीमध्ये विधानसभेसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. निवडणूक आयोग लवकरच निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. याआधीच पुदुचेरीत राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. काँग्रेस सरकारवर संकट घोंगावत असल्याचे चित्र आहे.

काँग्रेसमधून राजीनामा देऊन बाहेर पडलेले आमदार

  1. ए. नमः शिवायम - काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल, बेदींना हटवण्याची मागणी करणारे आमदार
  2. ई. थिपय्यींजन - काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल
  3. मल्लडी कृष्ण राव - सोमवारी राजीनामा दिला
  4. ए. जॉन कुमार - मंगळवारी राजीनामा दिला

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी