आजच्याच दिवशी झाला होता 'तो' भयंकर हल्ला! 

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याल आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. आजही त्या हल्याविषयी संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जात आहे. 

pulwama terrorist attack one year completed 14 feb 2019
आजच्याच दिवशी झाला होता 'तो' भयंकर हल्ला!   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पुलवामातील भ्याड दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण
  • पुलावामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर करण्यात आला होता एअर स्ट्राईक
  • एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या नाड्या भारताने आवळल्या

नवी दिल्ली: पुलवामामधील भयंकर दहशतवादी हल्ला कुणीही विसरणार नाही. याच भयानक दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जैश-ए-मोहम्मद अतिरेक्यांनी भ्याड हल्ल्याची योजना आखली होती. जम्मू-काश्मीर आणि लडाखला यांना जोडणार्‍या एकमेव जम्मू-श्रीनगर महामार्गावर सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. महामार्गावरुन ताफा जात असताना दहशतवाद्याने आपली स्फोटकाने भरलेली गाडी ताफ्यातील एका गाडीवर धडकवली होती. ज्यात तब्बल ४० जवान शहीद झाले होते. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी 20 वर्षीय आदिल अहमद याने ३५० किलो वजनाचा बॉम्ब भरलेल्या कारने सीआरपीएफच्या जवानांच्या ट्रकला धडक दिली होती.

लष्करी तळ आणि जवानांना लक्ष्य करणं हे दहशतवाद्यांकडून वारंवार होत आहे. पुलवामापूर्वी उरी येथे देखील जवानांवर भीषण हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड संताप होता. उरीनंतर भारतीय सैन्याच्या पॅरा कमांडोजनी पाक व्याप्त भागात प्रवेश करुन सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यामुळे पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून तशीच मागणी होत होती. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच त्यांनी आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद या व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला होता. ज्यामुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त करण्यात येत होता. 

वास्तविक, जेव्हा सुरक्षा दलांचा ताफा जेव्हा खोऱ्यातील काही भागातून जात असतो तेव्हा सामान्य लोकांसाठीची वाहतूक रोखण्यात येते. याचाच फायदा घेत दहशतवाद्याने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन वाहनांना लक्ष्य करण्यात आलं होतं. 

दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात यावा यासाठी देशभरातून मागणी होत होती. त्याचवेळी अवघ्या काही दिवसात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये जैश-ए-मोहम्मद दहशतवादी तळावर हल्ला केला होता. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय हवाई दलाच्या मिराज 2000 लढाऊ विमानांनी स्पाइस 2000 बॉम्ब टाकून पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळ नष्ट केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी