फटाक्याच्या फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, १८ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 04, 2019 | 21:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Punjab Blast: पंजाबच्या बटाला येथे फटाकांच्या फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात १८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

punjab blast
फटाक्याच्या फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, १८ जणांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये फटाक्यांच्या कंपनीत भीषण स्फोट
  • कारखान्यातील स्फोटात १८ जणांचा मृत्यू 
  • बचाव पथक घटनास्थळी दाखल

गुरुदासपूर: पंजाबच्या गुरुदासपूरमधील बटाला येथे एका फटाक्यांच्या कारखान्यात प्रचंड मोठा स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. या स्फोटात तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटामुळे कारखान्यातील अनेक भाग कोसळला आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी हे ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. या घटनेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच बचाव कार्य सुरु असल्याची माहिती दिली. याबाबत त्यांनी ट्वीट करताना अशी माहिती दिली की, 'बटाला येथे फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सध्या डीसी आणि एसएसपी यांच्या नेतृत्वात बचाव कार्य सुरु आहे.' 

फटाक्याच्या कारखान्यातील स्फोट एवढा प्रचंड होता की, या कारखान्याच्या आजूबाजूच्या इमारतींचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या घटनेनंतर गुरुदासपूरचा खासदार सनी देओल यांनी या घटनेनंतर ट्वीट करुन दु:ख व्यक्त केलं आहे. 'बटालामध्ये फॅक्टरीमधील स्फोटाबाबतची बातमी ऐकून दु:ख वाटलं आहे. एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाची टीम बचत कार्यासाठी पोहचली आहे.' 

 

 

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) ची पथके मदत कार्यात तैनात आहेत. जिल्हा प्रशासन व पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी या दुर्घटनेच्या चौकशीची आदेश दिले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना ५०,००० रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच किरकोळ जखमींना २५,००० रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. 

दरम्यान, या घटनेबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. 'पंजाबच्या बटालामध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीमधील स्फोटामुळे झालेल्या दुर्घटनेबाबत ऐकून दु:ख वाटलं. या दु:खद घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांविषयी मी संवेदना व्यक्त करतो. तसंच जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी