प्रजासत्ताक दिनी राफेलच्या चित्तथरारक कसरती

एखादे रॉकेट उड्डाण करते त्या पद्धतीने आकाशात सरळ उभ्या रेषेत उंचच उंच जात राफेल विमान प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात दिमाखात उपस्थिती दर्शविणार आहे.

Rafales part of Republic Day flypast
प्रजासत्ताक दिनी राफेलच्या चित्तथरारक कसरती 

थोडं पण कामाचं

  • प्रजासत्ताक दिनी राफेलच्या चित्तथरारक कसरती
  • लढाऊ विमानांचा मोठा ताफा आणि उच्च क्षमतेची रडार हे भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य
  • भारताने विमान खरेदीला दिली संमती

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी राफेल लढाऊ विमान चित्तथरारक कसरती करणार आहे. एखादे रॉकेट उड्डाण करते त्या पद्धतीने आकाशात सरळ उभ्या रेषेत उंचच उंच जात राफेल विमान प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात दिमाखात उपस्थिती दर्शविणार आहे. भारतीय हवाई दलाच्या सेवेत दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच राफेल विमान प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार आहे. दिल्लीच्या आकाशात गर्जना करत राफेल उड्डाण करणार आहे. (Rafales part of Republic Day flypast)

एकलव्य आणि ब्रह्मास्त्र या दोन हवाई कसरतींसाठीच्या संरचनेसाठी राफेल विमानांची निवड झाली आहे. महाभारतात एकलव्याचा उल्लेख आहे. एकलव्य हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होता. त्याने गुरुंचा मातीचा पुतळा तयार केला आणि या पुतळ्याला गुरु मानून धनुर्विद्येचा अभ्यास केला होता. अचूक लक्ष्यभेद करण्यात तो सर्वोत्तम होता. या एकलव्याप्रमाणेच राफेल लढाऊ विमान अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी समर्थ आहे. यामुळेच एकलव्य या हवाई कसरतीच्या संरचनेत (formation) राफेलचा समावेश झाला आहे. तसेच अचूक हल्ला करुन सर्व नष्ट करणारे असे ब्रह्मास्त्र अर्थात वेगाने योग्य ठिकाणी हल्ला करुन संपूर्ण विनाश करण्याची क्षमता राफेलमध्ये आहे. याच कारणामुळे ब्रह्मास्त्र या हवाई कसरतीच्या संरचनेत (formation) राफेलचा समावेश झाला आहे.

भारताच्या हवाई दलात २०२० मध्ये राफेल विमानांचा समावेश झाला आहे. यानंतर पहिल्यांदाच राफेल विमान प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होत आहे. या सोहळ्यात एकलव्य आणि ब्रह्मास्त्र या दोन हवाई कसरतींसाठीच्या संरचनेसाठी राफेल विमानांची निवड झाली आहे.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात हवाई कसरतींसाठी भारतीय हवाई दलाच्या ३८ विमानांची निवड झाली आहे. यात राफेलचा समावेश आहे. एकलव्य या हवाई कसरतीच्या संरचनेत (formation) एक राफेल विमान कमी उंचीवरुन उड्डाण करेल आणि आकाशात सरळ उभ्या रेषेत उंचच उंच जाईल. राफेल सोबत दोन जॅग्वार आणि दोन मिग २९ लढाऊ विमानं उड्डाण करणार आहेत. 

भारताने फ्रान्ससोबत ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला आहे. हा ५९ हजार कोटी रुपयांचा करार आहे. हा करार २०१६मध्ये झाला. करारानुसार राफेल विमानांचा ताफा टप्प्याटप्प्याने भारतात दाखल होत आहे. पहिल्या टप्प्यात आलेली राफेल विमानं १० सप्टेंबर रोजी सर्वधर्म पूजा करुन हवाई दलात दाखल करुन घेण्यात आली.

भारत-चीन तणाव वाढला असताना पाच राफेल विमानांची पहिली तुकडी २८ जुलै रोजी भारतात पोहोचली. या विमानांना औपचारिकरित्या १० सप्टेंबर २०२० रोजी भारताच्या हवाई दलात दाखल करण्यात आले. याप्रसंगी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली, चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदुरिया उपस्थित होते. यानंतर ४ नोव्हेंबर रोजी आणखी तीन राफेल विमानांचा ताफा भारतीय हवाई दलात दाखल झाला. यामुळे भारतात दाखल झालेल्या राफेल विमानांची संख्या आठ झाली आहे. 

जानेवारी महिन्याच्या अखेरीस आणखी तीन राफेल विमानं भारतात दाखल होतील. या विमानांच्या पाठोपाठ मार्च महिन्यात आणखी तीन तर एप्रिल महिन्यात आणखी सात राफेल विमानं भारतात दाखल होणार आहेत. जानेवारीच्या अखेरीस भारतात दाखल होणार असलेल्या विमानांमुळे देशातील राफेल विमानांची संख्या ११ होणार आहे.

लढाऊ विमानांचा मोठा ताफा आणि उच्च क्षमतेची रडार हे भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य

भारतीय हवाई दलात राफेल, सुखोई, एलसीए तेजस, मिराज २०००, मिग या लढाऊ विमानांचा मोठा ताफा आहे. या व्यतिरिक्त हवाई दलात अॅपाचे, चिनूक हेलिकॉप्टर आहेत. मालवाहतूक तसेच सैन्याच्या तुकड्यांची वाहतूक करण्यासाठी हवाई दलाकडे सी १३० आणि सी १७ ग्लोबमास्टर ही विमानं आहेत. एएलएच रुद्र, एमआय ३५ ही हेलिकॉप्टर तसेच आयएल ७६ गजराज हे मालवाहक विमान आहे. आक्रमक लढाऊ विमानांचा मोठा ताफा तसेच उच्च क्षमतेची रडार हे भारतीय हवाई दलाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे.

हॅमर करणार शत्रूवर जोरदार प्रहार

राफेल विमान मीटियोर, स्कल्प आणि हॅमर या शस्त्रसामुग्रीमुळे खूप घातक होणार आहे. हॅमरची मारा करण्याची क्षमता २० ते ७० किमी इतकी आहे. हिमालयातील तसेच अन्यत्र पर्वतांमध्ये असलेले शत्रूचे बंकर, लपण्याची ठिकाणी नष्ट करणे हॅमरमुळे सोपे होणार आहे. भारताने फ्रान्ससोबत हॅमरसाठी करार केला आहे. हॅमरची पुरवठ्याची प्रक्रिया सुरू आहे.

भारताने विमान खरेदीला दिली संमती

भारत लवकरच ४७ हजार कोटी रुपयांची स्वदेशी ८३ तेजस मार्क १ ए विमानं खरेदी करणार आहे. भारताच्या ताफ्यातील ५९ मिग २९ विमानांचे अपग्रेडेशन केले जाईल तसेच भारत २१ नव्या मिग २९ विमानांची खरेदी करणार आहे. या खरेदीसाठी ७४१८ कोटींच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे. भारताने १२ सुखोई ३० लढाऊ विमानांची खरेदी करण्यासाठी १० हजार ७३० कोटी रुपयांच्या कराराला मान्यता दिली आहे. सुखोई विमानांची निर्मिती भारतात होणार आहे. एच. ए. एल. कंपनी ही निर्मिती करणार आहे. 

भारताने स्वदेशी २४८ अस्त्र बियाँड व्हिज्युअल रेंज क्षेपणास्त्र घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. तसेच एक हजार किमी पल्ला असलेल्या क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी डीआरडीओला मान्यता देण्यात आली आहे. हे दोन्ही प्रस्ताव मिळून ३८ हजार ९०० कोटी रुपयांचे करार होणार आहेत. लवकरच आणखी ३६ राफेल विमानांच्या तसेच एफ ए १८ सुपर हॉर्नेट विमानांच्या खरेदीलाही मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी