प्रियंका गांधींना ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधींनी दिली हिंमत; म्हणाले, “तू मागे हटू नकोस”

प्रियंका गांधींना ताब्यात घेतल्याची बातमी समोर येताच राहुल गांधी यांनी ट्विट करून प्रियंका गांधींना हिम्मत ठेवून मागे न हटण्यास सांगितले आहे.

Rahul Gandhi
राहुल गांधी   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • राहुल गांधी यांनी ट्विट करून प्रियंका गांधींना हिम्मत ठेवून मागे न हटण्यास सांगितले.
  • लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला.
  • प्रियंका गांधी लखीमपूर खेरीला जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचा हात धरत धक्काबुक्की केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. त्यात आठजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. या घटनेनंतर रात्री उशीरा या ठिकाणी पाहणीसाठी पोहचलेल्या काँग्रेसच्या महसचिव प्रियंका गांधी यांना मध्य रात्रीनंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे.  

प्रियंका गांधींना ताब्यात घेतल्याची बातमी समोर येताच राहुल गांधी यांनी ट्विट करून प्रियंका गांधींना हिम्मत ठेवून मागे न हटण्यास सांगितले आहे.  राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, “प्रियंका, मला माहीत आहे की तू मागे हटणार नाहीस. ते तुझ्या हिमतीने भयभीत झाले आहेत. न्यायासाठीच्या या अहिंसक लढाईत आपण देशाच्या अन्नदात्याला विजयी करू.”

दरम्यान, प्रियंका गांधी लखीमपूर खेरीला जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचा हात धरत धक्काबुक्की केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र, आज पहाटे साडेपाचच्या सुमारास प्रियंका गांधी यांना हरगाव परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसने प्रियंका गांधींचे कपडे ओढले आणि त्यांचा हात पोलिसांनी मुरडल्याचा आरोप केला आहे. 

लखीमपूर खेरीमध्ये काय झाले 

केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्या बनवीरपूर या मूळ गावात काही विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित राहणार होते. ज्या हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरणार होते, तेथेच सकाळपासून शेतकऱ्यांनी काळे झेंडे घेऊन धरणे धरले होते. समजूत काढूनही ते तेथून हलण्यास तयार नव्हते. तेथे शेतकऱ्यांच्या जमावात दोन मोटारी घुसल्याचे सांगण्यात येते. हिंसाचार झाल्यानंतर घटनेची पाहणी करण्यासाठी प्रियंका गांधी लखमीपूर येथे पोहचल्या. तर विरोधी पक्षांचे नेतेही घटनास्थळी पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी