Rahul Gandhi : आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) जवळ येत असताना आणि पुढील वर्षभरात काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Assembly Elections) पार पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं अध्यक्षपद (Congress President) कुणाकडे येणार,याची उत्सुकता ताणली गेली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीच अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी, अशी विनंती तमाम काँग्रेस नेते करत आहेत. मात्र सध्या तरी राहुल गांधी यापैकी कुणाचीही विनंती मान्य करण्याच्या मूडमध्ये नसल्याचंच दिसून येत आहे. आपल्याला काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद भूषवण्यात रस नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र आता सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या सक्रीय राहण्यात अडचणी निर्माण होत असून राहुल गांधींनी पूर्णवेळ ही जबाबदारी स्विकारावी, अशी मागणी पक्षातील अनेक जुनेजाणते नेते करत आहेत. मात्र सध्या तरी राहुल गांधी यांनी या मागणीला नकार देत आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.
सोनिया गांधी यांना गेल्या काही महिन्यात दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयोमानानुसार त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी निर्माण झाल्यामुळे त्या पक्षाला कितपत वेळ देऊ शकतील, याविषयी साशंकता आहे. राहुल गांधी हे पक्षाचं अध्यक्षपद स्विकारायला नकार देत असल्यामुळे आता तिसरा पर्याय म्हणून प्रियंका गांधींकडे पाहिलं जात आहे. 136 वर्ष जुन्या पक्षाची धुरा कुणाकडे सोपवली जाणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. प्रियंका गांधींच्या हातात पक्षाची सूत्रं गेली तर पक्षाची स्थिती सुधारू शकेल, अशी अपेक्षा अनेक नेत्यांना आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची कामगिरी फारच खराब राहिल्यामुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला होता.
रविवार, 21 ऑगस्टपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हेच पहिल्या पसंतीचे उमेदवार आहेत. मात्र ते स्वतःच या पदावर बसायला नकार देत असल्यामुळे आता कुणाची वर्णी काँग्रेसच्या अध्यक्षपदी लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गांधी परिवारातील कुणी सदस्य काँग्रेसचा अध्यक्ष होणार की घराण्याबाहेरील व्यक्तीकडे हे पद सोपवलं जाणार, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
अधिक वाचा - Railway Bridge: मुसळधार पावसाचा फटका; रेल्वे पूल कोसळला, पुरात वाहून गेला खांब, Watch Video
काँग्रेसवर सतत घराणेशाहीचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर गांधी घराण्याशी जवळीक असणारा मात्र गांधी परिवाराबाहेरील एखाद्या ज्येष्ठ नेत्याची निवड काँग्रेस अध्यक्षपदी केली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे या टीकेला काँग्रेसकडून उत्तर दिलं जाईल आणि गांधी परिवाराशी संबंधित व्यक्तीच्या हाती पद असल्यामुळे राहुल गांधींचाच रिमोट कंट्रोल पक्षावर राहिल, अशी चर्चा आहे.