Rahul Gandhi ED | काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात समन्स बजावण्यात आलं आहे. त्यापैकी राहुल गांधी यांची येत्या 13 जून रोजी ईडीकडून चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून काँग्रेसने शक्तीप्रदर्शन करण्याची जय्यद तयारी सुरू केली आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणाची बंद झालेली फाईल आता पुन्हा उघडण्यात आली आहे. ईडीने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली होती. राहुल गांधींनी 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहावं, असं फर्मान ईडीनं काढलं होतं. मात्र राहुल गांधी त्या दिवशी भारताबाहेर असणार होते. त्यामुळे ईडीकडून वेळ वाढवून मागण्यात आली होती. त्यानुसार आता 13 जून रोजी राहुल गांधी यांनी चौकशी होणार आहे. राहुल या वीकेंडला भारतात परत येत असून ते चौकशीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.
सोनिया गांधी यांनादेखील ईडीनं समन्स बजावलं होतं. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चौकशी तीन आठवड्यांनी पुढं ढकलण्यात आली आहे. सोनिया गांधींच्या कोरोना चाचण्या अद्यापही पॉझिटिव्ह येत असल्यामुळे त्या कोरोनातून पूर्ण बऱ्या झाल्यानंतरच त्यांची चौकशी केली जाणार आहे.
पक्षानं सर्व खासदारांना आणि निवडक पदाधिकाऱ्यांना 13 तारखेला दिल्लीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जेव्हा राहुल गांधी चौकशीसाठी ईडी कार्यालयात जातील, तेव्हा त्यांच्यासोबत काँग्रेसचे खासदार आणि दिग्गज नेतेदेखील असणार आहेत. कार्यकर्त्यांनाही मोठ्या संख्येनं हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून काँग्रेस यानिमित्तानं शक्तीप्रदर्शन कऱण्याच्या तयारीत आहे.
आमच्याकडे लपवण्यासारखे काहीच नसून आम्ही कुठलाही भ्रष्टाचार केलेला नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली आहे. आम्ही कायदे पाळणाऱ्या पक्षाचे प्रतिनिधी असून सर्व नियमांचं पालन करू, असं त्यांनी म्हटलं आहे. भाजपचे नेते अमित शाह जसे 2002 ते 2013 या काळात पळून जात होते, तसं आम्ही करणार नाही. कारण आम्ही निर्दोष आहोत, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे.
नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी संलग्न असणारे हे वृत्तपत्र 2008 सालापर्यंत काँग्रेसशी संलग्न होते. 1 एप्रिल 2008 साली हे वृत्तपत्र तात्पुरते बंद करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. 2009 मध्ये हे वृत्तपत्र कायमचे बंद करण्यात येत असल्याची घोषणा काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधींनी केली. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक फेरफार झाल्याची तक्रार केली होती. या वृत्तपत्राची मालकी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) या संस्थेकडे होती. या संस्थेकडून यंग इंडिया लिमिटेड या संस्थेने वृत्तपत्राचा ताबा घेतला. या संस्थेत सोनिया गांधी व राहुल गांधी यांची प्रत्येकी 38 टक्के मालकी आहे. या व्यवहार 90 कोटी रुपयांना झाला. वास्तविक, हजारो कोटींची मालमत्ता असलेल्या या वृतपत्राचा व्यवहार केवळ 90 कोटीत झाल्याला आक्षेप घेत सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात धाव घेतली होती.