First Bullet Train Date | देशात पहिली बुलेट ट्रेन (Bullet Train) कधी धावणार, याची सगळेच वाट पाहत आहेत. गेल्या काही वर्षांत भारतातील वेगवेगळ्या मेट्रो सिटीजमध्ये (Metro Cities) मेट्रो ट्रेन (Metro Trains) धावायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं आयुष्य बदललं आहे. प्रवास अधिक सुखाचा झाला असून वेळेतही बचत झाली आहे. आता सर्वांना वेध लागले आहेत ते देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे.
केंद्र सरकारकडून बुलेट ट्रेनच्या कामाच्या प्रगतीबाबत अलिकडे कुठलीच माहिती जाहीर कऱण्यात आली नव्हती. त्यामुळे बुलेट ट्रेन नेमकी कधी धावणार, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्र्विनी वैष्णव यांनी नुकतंच याचं उत्तर दिलं असून पहिली बुलेट ट्रेन कधी धावेल, याचा अंदाज व्यक्त केला आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अंदाजानुसार 2026 साली देशातील पहिली बुलेट ट्रेन धावू शकेल. गुजरातमधील सूरत ते बिलिमोरा या स्थानकांच्या दरम्यान ही ट्रेन धावू शकेल. बुलेट ट्रेनचं काम समाधानकारक वेगाने सुरू असून अपेक्षित वेळेत हे काम पूर्ण होणार असल्याचा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला आहे.
बिलिमोरा हे दक्षिण गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील ठिकाण आहे. या योजनेअंतर्गत मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांदरम्यान ‘हाय स्पीड ट्रेन’ धावणार आहे. या ट्रेनचा वेग ताशी 320 किलोमीटर असणार आहे. दोन शहरांमधील अंतर 508 किलोमीटर असून बुलेट ट्रेन मार्गावर 12 थांबे असणार आहेत. सध्या मुंबई ते अहमदाबाद प्रवासासाठी 6 ते 7 तासांचा वेळ लागतो. मात्र बुलेट ट्रेन सुरू झाल्यावर 3 तासात हा प्रवास पूर्ण करता येणार आहे. या योजनेसाठी 1.1 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यातील 81 टक्के वाटा जपानचा असणार आहे. दर 61 किलोमीटर अंतरावर खांब रोवण्यात आले असून पहिल्या 150 किलोमीटर मार्गावरील काम वेगाने सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
अधिक वाचा - Panna Diamond Mine: खाणीतून सापडला जबरदस्त हिरा आणि हा मजूर रातोरात झाला करोडपती, थक्क करणारी किंमत...
याशिवाय, दिल्ली ते वाराणसी मार्गावरही बुलेट ट्रेनचं काम होणार आहे. गेल्या काही वर्षात भारत सरकारने वंदे भारत, तेजस यासारख्या अनेक हाय स्पीड ट्रेन सुरू केल्या आहेत. आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती बुलेट ट्रेन कधी सुरु होणार याची. बुलेट ट्रेन हा भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे या प्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी भारतात आले होते. त्यानंतर या प्रकल्पाचं काम वेगाने सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.