Indian Railway New Luggage Rules: विमानाप्रमाणे रेल्वेतही सामानाची मर्यादा ठरली, ‘मापात’ न राहणाऱ्यांना होणार दंड

पूर्वीप्रमाणे आता रेल्वेने वाट्टेल तेवढ्या वजनाचे सामान नेता येणार नाही. विमानाप्रमाणेच रेल्वे प्रवासातील सामानाच्या वजनावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

Indian Railway New Luggage Rules
रेल्वे प्रवासातील सामानाच्या वजनावर मर्यादा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • विमानाप्रमाणे रेल्वे प्रवासासाठीही सामानाच्या वजनाची मर्यादा निश्चित
  • मर्यादेपेक्षा अधिक वजनाच्या सामानासाठी पैसे भरावे लागणार
  • बुक न केलेल्या अतिरिक्त वजनाच्या सामानावर भरभक्कम दंड

Indian Railway New Luggage Rules | रेल्वेनं प्रवास (Railway Travel) करताना यापुढे सोबत किती सामान (Luggage) बाळगायचं, याची मर्यादा लक्षात ठेवावी लागणार आहे. आतापर्यंत रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर सामानाच्या वजनाची (Weight) कुठलीही मर्यादा घातली जात नव्हती. मात्र आता मोदी सरकारनं याबाबत नवं धोरण (New Policy) आखलं असून विमानाप्रमाणेच रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांनाही ठरवलेल्या मर्यादेपर्यंत मोफत सामान नेता येणार आहे. अतिरिक्त सामानासाठी वेगळा दर आकारला जाणार असून मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्यांना भरभक्कम दंड भरावा लागणार आहे 

अशी आहे मर्यादा

एसी फर्स्ट क्लासने प्रवास कऱणाऱ्यांना 70 किलोपर्यंतचं लगेज मोफत नेला येईल. एसी टू टियरने प्रवास करत असाल तर तुम्ही जास्तीत जास्त 50 किलो सामान मोफत नेऊ शकता. तर एसी थ्री टियर, एसी कार चेअर आणि स्लीपरने प्रवास करणाऱ्यांसाठी ही मर्यादा असणार आहे 40 किलो. यापेक्षा अधिक वजनाचे सामान तुम्हाला न्यायचे असेल, तर त्यासाठी वेगळी रक्कम भरावी लागणार आहे. अतिरिक्त सामानाच्या वजनानुसार ही रक्कम ठरवली जाईल. अतिरिक्त सामानासाठीची किमान रक्कम आहे 30 रुपये. म्हणजेच ठरलेल्या मर्यादेपेक्षा एक किलो सामान जरी जास्त असेल तरी तुम्हाला किमान 30 रुपये त्यासाठी जास्तीचे भरावे लागतील. 

अधिक वाचा - Indian Railway to Open Pod Hotel : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खूशखबर, बातमी ऐकूनच व्हाल रिफ्रेश, आनंदाने माराल उड्या

रेल्वे मंत्रालयाची ताकीद

रेल्वेनं प्रवास करत असताना मर्यादेपेक्षा अधिक वजनाचं सामान बाळगलं, तर प्रवासाचा आनंद कमी होतो, असं रेल्वे मंत्रालयानं केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. जर ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वजनाचं सामान तुमच्याकडे असेल तर रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालयात जाऊन त्याचं बुकिंग करा, असा सल्ला रेल्वे मंत्रालयानं दिला आहे. 

लगेज बुक करण्याची पद्धत

ज्या ट्रेनने तुम्ही प्रवास करता, त्याच ट्रेनमधून सामान नेणार असाल, तर रेल्वे सुटण्याच्या किमान अर्धा तास अगोदर तुम्ही लगेच कार्यालयातून सामानाचं वजन करून त्यानुसार पैसे भरू शकता आणि त्याचं तिकीट घेऊ शकता. जर किती सामान सोबत बाळगायचं, याची पूर्वकल्पना तुम्हाला असेल, तर तिकीट बुक करतानाच सामानाचंही बुकिंग करता येऊ शकतं. बुक करण्यासाठी आलेलं लगेज हे व्यवस्थित पॅकिंग केलेलं आणि नीटनेटकं असणं गरजेचं आहे. अस्ताव्यस्त स्वरुपातील सामान सोबत नेण्यास यापुढे परवानगी असणार नाही. 

अधिक वाचा - US Secret Fighter Plane : अमेरिकेत तयार होतंय ‘सिक्रेट फायटर जेट’, कमालीच्या गुप्ततेत बनतंय पुढच्या पिढीचं अस्त्र

नियम न पाळल्यास मोठा दंड

जर मर्यादेपेक्षा जास्त सामान पैसे न भरता घेऊन जाताना कुणी आढळलं तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मर्यादेपेक्षा जितक्या जास्त वजनाचं सामान आढळेल, तेवढ्या वजनाच्या हिशेबाने दंड आकारला जाईल. सामान बुक करण्यासाठी जो दर ठरवून देण्यात आला आहे, त्याच्या सहापट दंड प्रवाशांना भरावा लागेल. उदाहरणार्थ, जर अतिरिक्त सामान बुक करण्यासाठी पार्सल कार्यालयात 30 रुपये आकारले जात असतील, तर तेवढ्या वजनाच्या सामानासाठी 180 रुपये दंड आकारला जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी