रेल्वेत मास्क न घालणाऱ्या प्रवाशांना होणार ५०० रुपयांचा दंड

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 17, 2021 | 16:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेल्वेकडून नियमांचे कसोशीने पालन केले जात आहे. रेल्वेमध्ये मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांना आता रेल्वे प्रशासनाकडून ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

Rs 500 fine for not wearing mask in railway premises
मास्क न वापरल्यास रेल्वे करणार ५०० रुपयांचा दंड 

थोडं पण कामाचं

  • मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांना ५०० रुपयांचा दंड
  • रेल्वे बोर्डाच्या सूचना
  • रेल्वे विभागाचे परिपत्रक

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आपापल्या गावी परतण्यासाठी नागरिक रेल्वे स्टेशनवर धाव घेत आहेत. कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी रेल्वे विभागाने कोविड-१९ प्रोटॉकॉलची अंमलबजावणी सुरू केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेल्वेकडून नियमांचे कसोशीने पालन केले जात आहे. रेल्वेमध्ये मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांना आता रेल्वे प्रशासनाकडून ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. ट्रेनमध्ये किंवा रेल्वेच्या परिसरात विना मास्क वावरणाऱ्या नागरिकांना हा दंड केला जाणार आहे.

रेल्वे बोर्डाच्या सूचना


प्रवाशांमुळे वाढणारा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन अनेक पावले उचलत आहे. कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांमधीलच एक नियम मास्कच्या वापरासंदर्भातील आहे. मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांना ५०० रुपयांपर्यत दंड केला जाणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाने ट्विट करून दिली आहे. रेल्वे बोर्डाकडून देशभरातील सर्व रेल्वे विभागांना एका परिपत्रकाद्वारे या सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे परिसरातील स्वच्छतेचे उल्लंघन करण्यासंदर्भातील २०१२च्या कायद्याअंतर्गत या सूचना करण्यात आल्या आहेत.

एसओपीचे पालन


आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि गृहमंत्रालयाकडून वेळोवेळी कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासंदर्भात देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे रेल्वे मंत्रालयाकडून पालन केले जात आहे. मास्क वापरण्यासंदर्भातील नियम हादेखील त्याचाच एक भाग आहे. कोरोनाच्या संकटाला रोखण्यासाठी आणि या काळात प्रशासनाने नेमके काय करावे यासाठी केंद्र सरकारने एक स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रॉसिजरदेखील (एसओपी) बनवली आहे. रेल्वेच्या वाहतूकीसाठीदेखील अशीच एक एसओपी असून मास्कच्या वापरासंदर्भात रेल्वे विभाग त्याचे पालन करत आहे, असे रेल्वे बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

सार्वजनिक आरोग्याची काळजी


प्रवाशांनी रेल्वे परिसरात वावरताना त्या परिसराच्या स्वच्छतेची काळजी घ्यावयाची आहे. कोणत्याही प्रवाशाने रेल्वेने थुंकण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधेव्यतिरिक्त इतरत्र थुंकण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे थुंकणे किंवा तत्सम अस्वच्छ कृतींना आळा घालण्यासाठी मास्क वापर आवश्यक आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठीदेखील मास्क लावणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे ट्रेन किंवा रेल्वे परिसरात वावरताना नागरिकांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे, असे पुढे रेल्वे विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे.

देशभर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून कामानिमित्त इतर राज्यांत गेलेल्या नागरिकांची आपल्या गावी परतण्यासाठी झुंबड उडाली आहे. रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाल्याचे दिसून येते आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग आणखी पसरू शकतो. म्हणून रेल्वे प्रशासनाकडून ही काळजी घेतली जात आहे. देशाततली अनेक ठिकाणी लॉकडाऊनदेखील सुरू करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरदेखील ताण पडत असून औषधांचा आणि हॉस्पिटलमधील बेडचा तुटवडा निर्माण झाला आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी