रूग्णाच्या पोटातून काढले ११६ खिळे आणि लोखंडाची तार; जीव वाचवण्यात यश

लोकल ते ग्लोबल
Updated May 15, 2019 | 13:20 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

राजस्थानात सरकारी हॉस्पिटलमध्ये झालेल्या ऑपरेशनमध्ये एका व्यक्तीच्या पोटातून ११६ लोखंडी खिळे, लोखंडाची एक मोठी तार आणि एक लोखंडी गोळी बाहेर काढण्यात आली. या ऑपरेशननंतर डॉक्टरही याविषयी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

stomach operation Rajasthan
रुग्णाच्या पोटातून काढले ११६ लोखंडी खिळे   |  फोटो सौजन्य: ANI

जयपूर : राजस्थानमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी,’चा प्रत्यय एका हॉस्पिटलमध्ये आला आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये झालेल्या ऑपरेशनमध्ये एका व्यक्तीच्या पोटातून ११६ लोखंडी खिळे, लोखंडाची एक मोठी तार आणि एक लोखंडी गोळी बाहेर काढण्यात आली. या ऑपरेशननंतर डॉक्टरही याविषयी आश्चर्य व्यक्त करत आहेत. एवढे लोखंड पोटात घेऊन हा माणूस जिवंतच कसा काय राहिला याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पण, डॉक्टरांच्या प्रयत्नांनी सगळे लोखंड पोटातून बाहेर काढण्यात आले असून, त्या रूग्णाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. राजस्थानातील बुंदी जिल्ह्यात हे यशस्वी ऑपरेशन झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एक रूग्ण केवळ पोटदुखीची तक्रार घेऊन सरकारी रूग्णालयात आला होता. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या अल्ट्रासाऊंड चाचणी नंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. ऑपरेशन दरम्यान, एका पाठोपाठ एक खिळे बाहेर काढण्यात आले. त्यात ११६ लोखंडी खिळे, एक मोठी लोखंडी तार आणि एक लोखंडाची गोळी बाहेर काढण्यात आली. लोखंडी खिळ्यांची लांबी साडे सहा सेंटीमीटर होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रूग्णाचे ऑपरेशन अतिशय यशस्वी झाले आहे.

 

 

'व्यक्ती मनोरुग्ण'

याबाबत डॉक्टर अनिल सैनी यांनी एएनआय वृत्त संस्थेला सांगितले की, संबंधित रूग्ण हा मनोरूग्ण आहे. तो आमच्या कोणत्याही प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. आम्ही त्याला अनेकवेळा एवढे लोखंड पोटात गेले कसे? हे विचारण्याचा प्रयत्न केला. पण,त्याने कधीच याचा खुलासा केलेला नाही. ऑपरेशननंतर त्याची प्रकृती आता स्थिर आहे. त्याला पोटात असह्य वेदना होत असल्यामुळेच डॉक्टरांनी ऑपरेशनचा पर्याय सुचविला होता. जेव्हा पोटाचा एक्स रे काढण्यात आला त्यावेळी आम्हांला आश्चर्य वाटले. त्याच्या पोटात लोखंडी खिळ्यांचा गुच्छ दिसत होता. त्यानंतर आम्ही तातडीने ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. आश्चर्याची गोष्ट ही संबंधित रूग्णाला आणि त्याच्या घरातील नातेवाईकांना याप्रकाराची काहीच कल्पना नव्हती, असे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमध्ये रूग्णाच्या पोटात इतके खिळे गेलेच कसे याविषयी सर्वांत मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. पण, मनोरूग्ण व्यक्तीच्या नातेवाईकांनाही याची कल्पना नसल्यामुळे त्याविषयी सस्पेन्स कायम राहणार आहे. तब्बल साडेसहा इंचाचे हे खिळे पोटात गेलेच कसे? याचा विचार आता डॉक्टरही करू लागले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी