राजस्थानच्या राजकीय रणात वसुंधरा राजेंची एन्ट्री

rajasthan political crisis राजस्थानमधील राजकीय रणसंग्राम सुरू आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे बुधवारी जयपूरमध्ये दाखल होत आहेत.

vasundhara raje in jaipur sachin pilot will address press conference
राजस्थानच्या राजकीय रणात वसुंधरा राजेंची एन्ट्री 

थोडं पण कामाचं

  • राजस्थानच्या राजकीय रणात वसुंधरा राजेंची एन्ट्री
  • जनतेचा मोठा पाठिंबा असलेल्या नेत्यांचे भाजपमध्ये स्वागत
  • सचिन पायलट पत्रकार परिषद घेण्याची शक्यता

नवी दिल्ली: राजस्थानमधील राजकीय रणसंग्राम (rajasthan political crisis) सुरू झाला आहे. पहिल्या फेरीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत (ashok gehlot) यांनी बाजी मारली. सचिन पायलट (sachin pilot) यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावरुन तसेच राजस्थान काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी झाली. यानंतर भाजपमध्ये हालचालींना वेग आला आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (vasundhara raje) बुधवारी जयपूरमध्ये दाखल (vasundhara raje in jaipur) होत आहेत. तर दिल्लीत सचिन पायलट एक पत्रकार परिषद (sachin pilot will address press conference) घेण्याची शक्यता आहे.

वसुधरा राजेंची राजस्थानच्या राजकारणात एन्ट्री

धौलपूरहून राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे बुधवारी जयपूरमध्ये दाखल होत आहेत. जयपूरमध्ये त्या भाजपच्या (bjp) प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. वसुंधरा राजे जयपूरला येत असल्याच्या वृत्ताला राजस्थान भाजपचे अध्यक्ष सतिश पुनिया यांनी दुजोरा दिला आहे. मात्र माजी मुख्यमंत्र्यांचा जयपूरमधील कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. 

जनतेचा मोठा पाठिंबा असलेल्या नेत्यांचे भाजपमध्ये स्वागत

राजस्थानच्या राजकीय घडामोडींवर भाजपकडून प्रामुख्याने केंद्रीयमंत्री गजेंद्र शेखावत, राज्यसभा खासदार ओम माथूर बोलत आहेत. मात्र वसुंधरा राजे यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. सचिन पायलट भाजपमध्ये प्रवेश करणार का, या प्रश्नावर उत्तर देताना जनतेचा मोठा पाठिंबा असलेल्या नेत्यांचे भाजपमध्ये स्वागत आहे, असे सतिश पुनिया म्हणाले. या पार्श्वभूमीवर वसुंधरा राजे यांच्या हालचालींवर बुधवारी सर्वांचेच लक्ष असेल.

सचिन पायलट पत्रकार परिषद घेण्याची शक्यता

सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक दिल्लीत आहेत. काँग्रेसच्या (congress) आतापर्यंतच्या कारवाईला उत्तर देण्यासाठी सचिन पायलट बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाने सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांना मंत्रीपदांवरुन तसेच पक्षातील महत्त्वाच्या पदांवरुन दूर केले तरी काँग्रेसमधून काढलेले नाही. मात्र सचिन पायलट यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलमध्ये थोडे बदल केले आहेत. काँग्रेस नेता म्हणून ओळख दाखवण्यासाठी सेट केलेला प्रोफाइल फोटो आणि कव्हर फोटो सचिन पायलट यांनी बदलला आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाने केलेल्या  कारवाईनंतर दोन ट्वीट केले. 'सत्य उघड होऊ नये म्हणून त्रास दिला जाऊ शकतो पण सत्याचा पराभव करता येत नाही', अशा स्वरुपाचे वाक्य सचिन पायलट यांनी ट्वीट केले. 

पायलट यांच्याविरोधात झालेली कारवाई दुर्दैवी आहे, अशा कारवाईची आवश्यकता नव्हती, काँग्रेसच्या चांगल्या नेत्यांना गमावून चालणार नाही; अशा स्वरुपाची मते व्यक्त करत समर्थन देणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे आभार मानण्यासाठी संध्याकाळी सचिन पायलट यांनी दुसरे ट्वीट केले. 'आज माझे समर्थन करणाऱ्या सर्व नेत्यांचे हार्दिक धन्यवाद आणि आभार. राम राम सा' अशा स्वरुपाचे ट्वीट पायलट यांनी केले. या ट्वीटनंतर सचिन पायलट बुधवारी पत्रकार परिषद घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसच्या राजस्थानमधील सर्व समित्या बरखास्त नव्याने रचना होणार

काँग्रेसने राजस्थानमधील पक्षाच्या  सर्व समित्या बरखास्त करुन नव्याने रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असताना सचिन पायलट यांनी त्यांच्या अनेक समर्थकांची काँग्रेसच्या महत्त्वाच्या समित्यांवर नियुक्ती केली होती. सर्व समित्या बरखास्त करुन पायलट समर्थकांना हटवण्यात आले आहे.

नाईलाज म्हणून कारवाई केली - गेहलोत

सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक यांच्यावर नाईलाज म्हणून कारवाई केली असे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले. राजस्थानमध्ये सरकार पाडण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. आधी दुर्लक्ष केले, पण हे प्रकार थांबले नाही त्यामुळे कारवाई करावी लागली, असे गेहलोत म्हणाले. काँग्रेसने केलेली कारवाई आणि गेहलोत यांचे वक्तव्य यावर सचिन पायलट यांच्याकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी