Rajnath Singh म्हणाले, अखंड भारताचे पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस; चर्चेला उधाण

Rajnath Singh Said Subhas Chandra Bose 1st PM Of Undivided India, Took Oath In 1943 : अखंड भारताचे पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. ते भारतीय शिक्षण मंडळाच्या 'शोधवीर समागम' या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.

Rajnath Singh
राजनाथ सिंह  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Rajnath Singh म्हणाले, अखंड भारताचे पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस; चर्चेला उधाण
  • सुभाषचंद्र बोस यांनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली
  • स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली तरी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वप्नातील भारत घडविणे आपल्याला जमलेले नाही

Rajnath Singh Said Subhas Chandra Bose 1st PM Of Undivided India, Took Oath In 1943 : भारताचे संरक्षणमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते राजनाथ सिंह यांनी केलेल्या एका वक्तव्याची सोशल मीडियावर सध्या भरपूर चर्चा सुरू आहे. हे वक्तव्य आहे सुभाषचंद्र बोस यांच्याविषयीचे. 

अखंड भारताचे पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. ते भारतीय शिक्षण मंडळाच्या 'शोधवीर समागम' या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे अखंड अविभाजीत अशा भारताचे पहिले पंतप्रधान होते. सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेचा आणि दूरदृष्टीचा नव्याने अभ्यास करणे आवश्यक आहे; असेही राजनाथ सिंह म्हणाले.

YouTube मध्ये Q&A फीचर, युझरना होणार फायदा

ATM कार्ड विसरलात? काळजी करू नका! स्मार्टफोनच्या मदतीने काढा एटीएममधून पैसे

VIDEO: भरमसाठ वीज बिलामुळे त्रस्त? मग या 5 गोष्टी करुन पाहाच...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वात आझाद हिंद सरकार स्थापन झाले. हे फाळणी होण्याआधीच्या अखंड अविभाजीत भारत देशाचे पहिले स्वदेशी सरकार होते. सुभाषचंद्र बोस यांनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. नेताजींच्या छोट्या कार्यकाळात भारताने गुलामीच्या बेड्यांतून मुक्त होण्याचे स्वप्न बघितले. जसे भारताने हे स्वप्न बघितले तसेच स्वतः सुभाषचंद्र बोस यांनीही गुलामीच्या बेड्यांतून मुक्त होण्याचे स्वप्न बघितले होते. यामुळेच त्यांनी आयसीएस अर्थात इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसमधील इंग्रजांच्या आदेशांचे पालन करण्याच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी इंग्रजांच्या व्यवस्थेपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आझाद हिंद फौज स्थापन केली; असे राजनाथ सिंह म्हणाले.

भारतात जाणीवपूर्वक अनेक वर्षांपासून सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जी कागदपत्रे सार्वजनिक असणे अपेक्षित होते अशी अनेक कागदपत्रे गुप्त ठेवण्यात आली होती. ही कागदपत्रे आता सार्वजनिक करण्यात आली आहेत. यामुळे सार्वजनिक केलेल्या कागदपत्रांच्या मदतीने सुभाषचंद्र बोस यांचा नव्याने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. भारत सरकारने अलिकडेच इंग्रजांच्या काळातील राजेशाही मानसिकतेतून बाहेर पडत राजपथ या मार्गाचे नामांतर कर्तव्य पथ केले आहे. इंडिया गेट या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांची भव्य प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे. नेताजींपासून प्रेरणा घेऊन नागरिकांनी आपल्या कर्तव्यांचे पालन करावे या विचारातून ही रचना करण्यात आली आहे. 

स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली तरी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वप्नातील भारत घडविणे आपल्याला जमलेले नाही. याला एक मोठे कारण आहे. इंग्रजांकडून देशाच्या सत्तेचे हस्तांतर एका अशा राजकीय पक्षाकडे झाले ज्याने देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर येण्यास आवश्यक ती मदत केली नाही. अलिकडेच केंद्र सरकारने भारतीय नौदलाचा झेंडा बदलला. झेंड्यातून सेंट जॉर्ज क्रॉस काढला. भारतात ज्यांनी पहिल्यांदा नौदल (आरमार) स्थापन केले त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतून प्रेरणा घेऊन एक चिन्ह तयार केले. हे चिन्ह नौदलाच्या झेंड्यात स्थापन केले. सरकारने सुमारे 1500 कालबाह्य कायदे रद्द केले. सुभाषचंद्र बोस यांनी दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून अंदमान निकोबार बेटांच्या समुहातील रॉस बेटाचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस बेट (द्वीप), नील बेटाचे नाव शहीद बेट (द्वीप) आणि हॅवलॉक बेटाचे नाव स्वराज बेट (द्वीप) असे केले आहे; अशी माहिती पण राजनाथ सिंह यांनी दिली. 

एकेकाळी विश्वगुरु असलेला भारत गुलामीच्या कालखंडात देशाच्या गौरवशाली इतिहासापासून दुरावला आहे. पायथागोरसचे प्रमेय म्हणून जे ओळखले जाते ते बोधायनने 300 वर्षे आधीच सांगितले होते. आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, बोधायन, चरक, सुश्रुत, नागार्जुन, कणाद यांच्यापासून ते सवाई जयसिंह पर्यंत संशोधकांची मोठी परंपरा भारताकडे आहे. कोपरनिकसच्या एक हजार वर्ष आधी आर्यभट्ट यांनी पृथ्वी गोल आहे आणि स्वतःभोवती तसेच सूर्याभोवची फिरते असे सांगितले होते. 

स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती यांच्या विचारांनी प्रेरित असलेला भारत पुन्हा एकदा प्रगतीच्या वाटेवर वेगाने घोडदौड करत आहे. येणाऱ्या काळात पुन्हा एकदा अध्यात्म आणि ज्ञानाच्या क्षेत्रात भारत विश्वगुरु होईल; असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या या भाषणावरून सोशल मीडियात चर्चेला उधाण आले आहे. समर्थन आणि विरोध, पाठिंबा आणि टीका अशा दोन्ही पद्धतीने राजनाथ सिंह यांच्या भाषणावर मतप्रदर्शन सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी