Rajya Sabha Election Result 2020 बघा कोणत्या जागेवर कोण विजयी

राज्यसभेच्या १८ जागांसाठी १९ जून रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीचा (Rajyasabha election Results) निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर झाला.

Rajya Sabha Election Result 2020
राज्यसभा निवडणूक निकाल २०२० 

थोडं पण कामाचं

  • राज्यसभा निवडणूक २०२० - बघा कोणत्या जागेवर कोण विजयी
  • माजी पंतप्रधान देवेगौडा आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचा विजय
  • दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे राज्यसभेत

नवी दिल्ली: राज्यसभेच्या १८ जागांसाठी १९ जून रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीचा (Rajyasabha election Results) निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर झाला. काँग्रेसने गुजरातमध्ये नोंदवलेल्या आक्षेपांवर सुनावणी झाली आणि ते फेटाळण्यात आले. मात्र ही प्रक्रिया होईपर्यंत वेळ गेल्यामुळे गुजरातची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

दीर्घ काळापासून संसदेपासून दूर असलेले झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन (shibu soren) आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा (H D Devegowda) पुन्हा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya scindia) पहिल्यांदाच भाजपच्या तिकिटावरुन राज्यसभेत पोहोचले आहेत. राजस्थानमधून काँग्रेसचे नीरज डांगी, के सी वेणुगोपाल (K C Venugopal) पहिल्यांदाच राज्यसभेत दाखल झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) बिनविरोध तर दिग्विजयसिंह (Digvijay singh) निवडणूक जिंकून राज्यसभेत पोहोचले. आंध्रमधील चार जागांवर वायएसआर काँग्रेसच्या (YSR Congress) उमेदवारांचा विजय झाला. मणिपूरमध्ये सरकार अडचणीत असले तरी भाजपने राज्यसभेची एकमेव जागा जिंकली. 

राज्यस्थानमध्ये तीन पैकी दोन जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर भाजपचा विजय झाला तर मध्य प्रदेशमध्ये तीनपैकी दोन जागांवर भाजप आणि एका जागेवर काँग्रेसचा विजय झाला. अरुणाचल प्रदेशमधील एका आणि कर्नाटकमधील चार जागांवर बिहनविरोध निवड झाली.

थोडक्यात जाणून घेऊ कोणत्या जागेवर कोण विजयी - 

कर्नाटक -  माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा राज्यसभेत

कर्नाटकमधून जनता दल सेक्युलर पक्षाचे नेता आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा राज्यसभेत पोहोचले. भाजप आणि काँग्रेसने सहकार्याची भूमिका घेतल्यामुळे कर्नाटकमध्ये निवडणूक टळली. देवेगौडा यांच्या व्यतिरिक्त कर्नाटकमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले. राष्ट्रीय सरचिटणीस असल्यामुळे खर्गे यांचा विजय काँग्रेससाठी महत्त्वाचा समजला जात आहे. भाजपचे इरन्ना कडाडी आणि अशोक गस्ती यांचीही बिनविरोध निवड झाली. कडाडी लिंगायत समाजाचे आहेत आणि बेळगावी जिल्ह्यात राहतात. तर गस्ती नाई समाजाचे आहेत. ते रायचूर जिल्ह्यात राहतात आणि अनेक वर्षांपासून भाजपसोबत आहेत.

मध्य प्रदेश - दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेरसिंह सोलंकी

मध्य प्रदेशमधून काँग्रेसचे दिग्विजय सिंह विजयी झाले. भाजपच्या तिकिटावर ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेरसिंह सोलंकी राज्यसभेत पोहोचले. ज्योतिरादित्य शिंदे आधी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होते. मात्र काँग्रेसकडून मिळणाऱ्या वागणुकीने दुखावल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये दाखल होताना त्यांनी मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडले होते. मध्य प्रदेशमधील तिसऱ्या जागावेर व्यवसायाने प्रोफेसर असलेले सुमेरसिंह सोलंकी भाजपच्या तिकिटावर विजयी झाले. त्यांना ५५ मते मिळाली. भाजपने उमेदवारी दिल्यानंतर सोलंकी यांनी सरकारी कॉलेजमधील नोकरीचा राजीनामा दिला. सुमेरसिंह सोलंकी माजी खासदार माकन सिंह यांचे नातलग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. ते अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व करतात.

राजस्थान - के सी वेणुगोपाल आणि नीरज डांगी यांच्यासह राजेंद्र गहलोत राज्यसभेत

राजस्थानमधून काँग्रेसचे के सी वेणुगोपाल आणि नीरज डांगी तर भाजपचे राजेंद्र गहलोत राज्यसभेवर गेले. वेणुगोपाल आणि डांगी पहिल्यांदाच राज्यसभेत पोहोचले आहेत. दोघेही दीर्घ काळापासून काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत. डांगी हे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे समर्थक आहेत. भाजपचे राजेंद्र गहलोत ५४ मते मिळवत राज्यसभेत पोहोचले. ते जोधपूरचे जल भगीरथ म्हणून ओळखले जातात. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि भाजपचे राजेंद्र गहलोत हे दोघे माळी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. राजेंद्र गहलोत यांनी दोन वेळा अशोक गहलोत यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. 

झारखंड - शिबू सोरेन आणि भाजपचे दीपक प्रकाश विजयी

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेता आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन आणि भाजपचे दीपक प्रकाश हे दोघे झारखंडमधून राज्यसभेत पोहोचले. 

आंध्र - वायएसआर काँग्रेसचा दबदबा, चार जागांवर विजय

आंध्रमध्ये वायएसआर काँग्रेसचा दबदबा दिसून आला. त्यांनी राज्यातील राज्यसभेच्या चार जागांवर विजय मिळवण्याची कमाल केली. परिमल नथवानी, मोपीदेवी वेंटकरमण, पिल्लई सुभाष चंद्र बोस आणि उद्योगपती अल्ला अयोध्या रामी रेड्डी यांचा विजय झाला. 

मणिपूर - भाजपचा विजय

मणिपूरमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक होती. काँग्रेसने भाजपच्या काही आमदारांना आपल्याकडे खेचून राजीनामा देण्यास भाग पाडले. यामुळे राज्यातले सरकार अल्पमतात आले तरी भाजपने राज्यसभेची निवडणूक जिंकली. भाजपच्या लेसेम्बा सनाजओबा यांनी काँग्रेसच्या के टी मांगी बाबू यांचा पराभव केला.

अरुणाचल प्रदेश - भाजपच्या नबाम रेबिया यांची बिनविरोध निवड

अरुणाचल प्रदेशमधील राज्यसभेच्या एकमेव जागेवर भाजपच्या नबाम रेबिया यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्याविरोधात कोणीही निवडणूक लढवली नाही. 

मेघालय - एनपीपीच्या उमेदवाराचा विजय

मेघालयमधून नॅशनल पीपल्स पार्टीच्या  डॉ. डब्ल्यू आर खारलुखी यांची राज्यसभेवर निवड झाली. मेघालय डेमोक्रॅटिक अलायन्समधील घटक पक्षांच्या पाठिंब्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला.

मिझोरम - मिझो नॅशनल फ्रंटचा विजय

मिझोरममधून मिझो नॅशनल फ्रंटचे (MNF) उमेदवार वानलालवेना यांचा विजय झाला. त्यांनी पीपल्स मुव्हमेंटच्या बी लालछानजोवा यांचा पराभव केला. मिझो नॅशनल फ्रंट एनडीएचा घटक पक्ष असल्यामुळे वानलालवेना राज्यसभेत सत्ताधारी  खासदारांसोबत बसणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी