राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचे निधन 

Amar Singh: राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. ते ६४ वर्षांचे होते. सिंगापूर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

Amar Singh
अमर सिंह (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • अमर सिंह यांचे सिंगापूरमध्ये निधन 
  • अमर सिंह यांच्यावर सिंगापूर येथे रुग्णालयात सुरु होते उपचार 
  • अमर सिंह हे राज्यासभेचे खासदार

Amar Singh: राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. ते ६४ वर्षांचे होते. अमर सिंह हे गेल्या दीर्घकाळापासून आजारी होते आणि त्यांच्यावर सिंगापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. किडनीच्या आजारासह इतरही आजारांनी ग्रस्त होते. काही काळापूर्वी अमर सिंह यांचे मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले होते. दीर्घकाळापासून आजारी असल्याने अमर सिंह हे सामाजिक आणि राजकीय जीवनापासून दूर होते. अमरसिंह यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. अमर सिंह हे उत्तरप्रदेशातील आझमगड येथील निवासी होते. सर्वच राजकीय पक्षांसोबत अमर सिंह यांचे चांगले संबंध होते.

एकेकाळी उत्तरप्रदेशातील दिग्गज नेत्यांच्या यादीत अमर सिंह यांचे नावे घेतले जात होते. अमर सिंह हे समाजवादी पक्षाचे प्रमुख असलेले मुलायमसिंह यादव यांचे जवळचे सहकारी मानले जात होते.

अमरसिंह हे उत्तरप्रदेशातून राज्यसभेचे खासदार होते. ५ जुलै २०१६ रोजी ते राज्यसभेवर निवडून गेले. समाजवादी पक्षातून वेगळे झाल्यापासून ते राजकारणातही जास्त सक्रीय नव्हते. तसेच आजारपणापूर्वी अमर सिंह यांची भाजप नेत्यांसोबत जवळीक वाढत होती. अमर सिंह यांनी १९९६ साली राज्यसभेवर निवडून येत आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात केली.

अमिताभ बच्चन यांचे निकटवर्तीय होते अमर सिंह

अमर सिंह सध्या राज्यसभेचे खासदार होते. यापूर्वी २००२ आणि २००८ मध्येही अमर सिंह हे राज्यसभेवर निवडून गेले होते. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांच्यासोबतच अमर सिंह यांचेही बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबियांशी खूप जवळचे संबंध होते. गेल्या काही वर्षांत या नात्यात कटूता निर्माण झाली होती. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अमर सिंह यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत अमिताभ बच्चन यांची माफी मागितली होती.

समाजवादी पक्षाची कमान अखिलेश यादव यांच्या हातात आल्यापासून अमर सिंह हे पक्षातील कार्यक्रम, निर्णय प्रक्रियेतून दूर होऊ लागले. २०१७ मध्ये समाजवादी पक्षात झालेल्या वादानंतर अमर सिंह यांना अखिलेश यादव याने खलनायक ठरवत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. इतकेच नाही तर राज्यसभेचे खासदार प्रो. रामगोपाल वर्मा यांनीही अमर सिंह यांच्यावर टीका केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी