लखनऊच्या किसान महापंचायतीत पोहोचले राकेश टिकैत

Rakesh Tikait in Lucknow Kisan Mahapanchayat उत्तर प्रदेशमध्ये लखनऊ येथे सुरू असलेल्या किसान महापंचायतीमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत पोहोचले आहेत.

Rakesh Tikait in Lucknow Kisan Mahapanchayat
लखनऊच्या किसान महापंचायतीत पोहोचले राकेश टिकैत 
थोडं पण कामाचं
  • लखनऊच्या किसान महापंचायतीत पोहोचले राकेश टिकैत
  • किसान महापंचायतीने वीज, पाणी, डिझेल, महागाई या मुद्यांवरही केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याचे संकेत दिले
  • एमएसपीचा कायदा करुन लागू करावा, कृषी कायदे संसदेत प्रस्ताव आणून मागे घ्यावे - किसान महापंचायत

Rakesh Tikait in Lucknow Kisan Mahapanchayat लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये लखनऊ येथे सुरू असलेल्या किसान महापंचायतीमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी पुढील कार्यक्रम ठरविण्यासाठी किसान महापंचायतीचे आयोजन केले आहे. 

शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या ७५० जणांना शहीद हा दर्जा देण्याची मागणी राकेश टिकैत यांनी केली आहे. पंतप्रधानांनी भारताचे गृह राज्यमंत्री अजय मिश्र यांचा राजीनामा घ्यावा. तसेच किमान आधार मूल्य अर्थात एमएसपी (Minimum Support Prices) या संदर्भात केंद्र सरकारने कायदा करावा, अशीही मागणी टिकैत यांनी केली आहे. दुधाबाबत लवकरच एक धोरण जाहीर होणार असल्याचे वृत्त आहे. या धोरणाला आमचा विरोध असेल, असे टिकैत म्हणाले. बियाणांच्या कायद्याविषयीही आमची स्वतंत्र भूमिका आहे; असे टिकैत यांनी सांगितले. कृषी क्षेत्राबाबतच्या वेगवेगळ्या मुद्यांवर केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांची चर्चा होणे आवश्यक असल्याचे टिकैत म्हणाले. 

पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे संयुक्त किसान मोर्चाचे योगेंद्र यादव म्हणाले. शेतकऱ्यांमध्ये या पुढेही लढण्याची वृत्ती कायम असल्याचे ते म्हणाले. पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि उत्तर प्रदेशची निवडणूक डोळ्यांपुढे दिसू लागली म्हणून कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा झाल्याचे योगेंद्र यादव म्हणाले. शेतकऱ्यांना धान्य नाही तर त्यांच्या पिकाला योग्य मूल्य हवे असल्याचे योगेंद्र यादव यांनी सांगितले. एमएसपी संदर्भात कायदा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे योगेंद्र यादव यांनी जाहीर केले. भारताचे गृह राज्यमंत्री अजय मिश्र यांचा राजीनामा घेऊन त्यांना अटक करावी, अशीही मागणी योगेंद्र यादव यांनी केली. 

किसान महापंचायतीने वीज, पाणी, डिझेल, महागाई या मुद्यांवरही केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याचे संकेत दिले. एमएसपीचा कायदा करुन लागू करावा, कृषी कायदे संसदेत प्रस्ताव आणून मागे घ्यावे; असेही किसान महापंचायत म्हणाली. आमच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नसल्याचे किसान महापंचायतीने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी