Pakistan: पाक पंतप्रधानांना सापाच्या चमड्याची सँडल भेट; कारागिराने भरला दंड

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 04, 2019 | 21:03 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Pakistan: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना खूष करण्यासाठी एकाने चक्का सापाच्या चमड्यापासून सँडल तयार केली. ईदच्या निमित्ताने इम्रान यांना ही सँडल भेट देण्यासाठी तयार करण्यात आली होती, त्याला दंड ठोठावलाय.

Pakistan PM Imran Khan
पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सापाच्या चमड्याचे सँडल   |  फोटो सौजन्य: Times Now

पेशावर: एखाद्या नेत्यावर वेड्यासारखं प्रेम करणाऱ्यांची संख्या फक्त भारतातच आहे असं नाही. शेजारच्या देशात अर्थात पाकिस्तानातही अशा नेत्यावर अपार प्रेम करणारे भरपूर आहेत. अनेकदा या प्रेमापोटी किंवा आपल्या नेत्याला केवळ खूष करण्यासाठी कायद्याची चौकट मोडली जात असल्याचं आपण भारतात पाहतो. तसा प्रकार पाकिस्तानातही होताना दिसतो. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना खूष करण्यासाठी एकाने चक्का सापाच्या चमड्यापासून सँडल तयार केली. ईदच्या निमित्ताने इम्रान यांना ही सँडल भेट देण्यासाठी तयार करण्यात आली होती. पण, पाकिस्तानातील वन्यजीव कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याला एक दोन नव्हे तर, ५० हजार पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आणि त्यानंतर त्याला सँडल परत करण्यात आली.

चप्पल दुकानावर छापा

सध्याच्या घडीला पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खान सर्वांत लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या अगणित आहे. त्यातील एका चाहत्याने त्यांना ईदच्या निमित्ताने सँडल भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यानं सापाचे चमडे वापरले. पण, पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील वन्यजीव अधिकाऱ्यांनी पाकच्या वन्यजीव अधिनियम अंतर्गत त्याच्यावर कारवाई केली आहे. नूरुद्दीन शिनवारी, असं त्या चाहत्याचं नाव आहे. वन्यजीव अधिकाऱ्यांनी खैबर पख्तूनख्वा प्रांतात जहाँगीर पुरा बाजारपेठेतील नूरुद्दीनच्या दुकानावर छापा टाकला. या छाप्यात पारंपरिक पेशावरी पद्धतीचे सापाच्या चमड्यापासून तयार केलेल्या सँडलचे दोन जोड जप्त करण्यात आले. मुळात नुरूद्दीनचे दुकान त्या परिसरात सँडलसाठी खूप प्रसिद्ध आहे. ‘कप्तान स्पेशल चप्पल्स’ अशी त्याच्या सँडलची ओळख आहे.

दंड भरला; आता ईदला भेट देणार

छाप्यानंतर नुरूद्दीनची चौकशी करण्यात आली. त्यावर त्याने ही सापाची चामडी अमेरिकेहून दोन सँडल तयार करण्यासाठी पाठवण्यात आल्याचं सांगितलं. त्यातील एक सँडल जोड पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भेट देण्यात येणार होता. तर एक सँडलचा जोड सापाची चामडी पाठवणाऱ्याला द्यायचे होते. जिल्हा वन अधिकाऱ्यांना या चमड्याच्या संडली माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी फिल्मी स्टाईलने ग्राहक बनून नुरुद्दीनच्या दुकानात प्रवेश केला आणि सँडलची मागणी केली होती. संशय खरा ठरल्यानंतर नुरुद्दीनवर छाप्याची कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दोन सँडल जप्तकरून लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवली आहेत. वन खत्याने नुरुद्दीनला सँडल परत केली आहे. पण, त्याच्याकडून वन्यजीव कायद्या अंतर्गत ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. डॉन न्यूज या वेबसाईटला माहिती देताना नुरुद्दीनने चप्पल परत मिळाल्याचे आणि ५० हजार रुपये दंड झाल्याचे सांगितले. आता ही सँडल पंतप्रधान इम्रान खान यांना ईदच्या दिवशी भेट देणार असल्याचे त्याने सांगितले आहे.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी