नवी दिल्ली: भाजपचे माजी आमदार मनोज शौकीन यांच्याविरोधात त्यांच्याच सुनेने थेट बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांच्या सुनेने पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे. या तक्रारीत असं म्हटलं आहे की, ३१ डिसेंबर २०१८ आणि १ जानेवारीला मध्यरात्री कथित स्वरुपात मनोज शौकीन यांनी बंदुकीचा धाक दाखवून आपल्याच सुनेवर बलात्कार केला. तसंच तिला धमकावलं देखील. याचप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. पीडित महिलेने गुरुवारी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ज्यानंतर नांगलोई विधानसभा मतदारसंघातून दोनदा निवडून आलेल्या शौकीन यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने आपल्या तक्रारीत असा आरोप केला आहे की, ३१ डिसेंबरला ती आपल्या पती, भाऊ आणि चुलत भावासोबत माहेरुन सासरी जात होते. पण घरी जाण्याऐवजी तिचा पती तिला पश्चिम विहार येथील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला
एफआयआरनुसार, 'जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये पोहचलो तेव्हा नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी माझे काही नातेवाईक आधीच तिथे उपस्थित होते. पार्टी संपल्यानंतर आम्ही जवळजवळ साडे बारा वाजता सासरी पोहोचलो. पण त्यानंतर माझे पती हे त्यांच्या मित्रांसह बाहेर निघून गेले आणि मी झोपण्यासाठी माझ्या खोलीत गेले.'
पीडित महिलेने यापुढे असा आरोप केला आहे की, रात्री साधारण १.३० वाजता तिच्या सासऱ्यांनी तिला दरवाजा खोलण्यास सांगितलं. त्यावेळी त्यांनी तिला असं सांगितलं होतं की, त्यांना तिच्याशी काही तरी महत्त्वाचं बोलायचं होतं.
'माझ्या खोलीत घुसताच त्यांनी मला चुकीच्या पद्धतीने हात लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की, तुम्ही झोपायला जा. कारण त्यावेळी ते दारु प्यायले होते. पण अचानक त्यांनी त्यांच्याजवळची बंदूक काढली आणि माझ्या कानशिलात लगावली. जेव्हा मी आरडाओरडा सुरु केला त्यावेळी त्यांनी मला माझ्या भावाला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. सुरुवातीला मी माझं लग्न टिकविण्यासाठी आणि भावाला वाचविण्यासाठी मी त्यांची पोलिसात तक्रार दिली नाही.'
दरम्यान, पीडित महिलेने असंही सांगितलं की, माझ्या सासरकडील लोकांविरुद्ध आधीच कोर्टात घरगुती हिंसाचार प्रकरणी खटला सुरु आहे. ही तक्रार देखील पीडितेनेच मागील वर्षी केली होती.
'याच वर्षी सात जुलैला सीए़डब्ल्यू सेलमध्ये माझ्या आई आणि वडिलांचा छळ करण्यात आला होता. याप्रकरणी साकेत पोलीस स्थानकात एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बुधवारी मी जेव्हा घरगुती हिंसाचार प्रकरणी साकेत कोर्टात गेलील आणि माझी साक्ष देण्यासाठी प्रोटेक्शन अधिकाऱ्याला भेटली तेव्हा संबंधित प्रोटेक्शन अधिकाऱ्याने मला आणि माझ्या कुटुंबीयांना सुरक्षेची हमी दिली. त्यानंतर मी माझ्यासोबत झालेल्या अत्याचाराबाबत अधिकारी आणि कुटुंबीयांना सांगितलं.'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शौकीन यांच्याविरोधात कलम ३७६ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता अधिक तपास सुरु केला आहे.