Padma Award Nomination: भारत सरकारने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर आपण पद्म पुरस्कारासाठी योग्य व्यक्तींची नावं सुचवू शकता. केंद्र सरकारची समिती सुचविलेल्या नावांचा विचार करणार आहे. पोर्टलवर १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत पद्म पुरस्कारांसाठी नावं सुचविण्याची संधी आहे. एखादी व्यक्ती स्वतःचे किंवा इतर कोणाचेही नाव पुरस्कारासाठी योग्य व्यक्ती म्हणून सुचवू शकते.
पोर्टलवर पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री या मोठ्या नागरी पुरस्कारांसाठी नावं सुचविण्याची संधी नागरिकांना उपलब्ध आहे. याआधी पोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने नावं सुचविण्याची संधी उपलब्ध नव्हती. नावं सुचविताना काही अटींचे पालन करणे प्रत्येकाला बंधनकारक आहे. सरकारी कर्मचारी, सार्वजिक उपक्रमांतील कर्मचारी यांना स्वतःचे नाव पुरस्कारासाठी सुचविता येणार नाही. डॉक्टर आणि संशोधक यांना या नियमातून वगळण्यात आले आहे. ते पद्म पुरस्कारासाठी स्वतःचे नाव सुचवू शकतील.
पद्म पुरस्कार कला, सामाजिक कार्य, सामाजिक जीवन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, व्यवसाय आणि उद्योग, वैद्यकीय क्षेत्र, साहित्य आणि शिक्षण, नागरी सेवा, क्रीडा तसेच अध्यात्म, योग, वन्यजीव संरक्षण, संरक्षण, पाककला, अभिनव संशोधन, कृषी, पुरातत्व, वास्तुकला आदी श्रेणीत दिले जातात.
पद्म पुरस्कारांसाठी नावं सुचविण्याकरिता https://awards.gov.in/ या पोर्टलवर जा. रजिस्ट्रेशन वर क्लिक करून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करा. आधार क्रमांक सांगून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल. नंतर व्यक्ती वा संस्था यांचे नाव पुरस्कारासाठी सुचवू शकाल. नाव सुचविताना संबंधित व्यक्तीचा परिचय द्या तसेच त्याच्या कार्याची माहिती नमूद करा. कार्याची माहिती देणारे फोटो अपलोड करा. आधी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेला याच कार्यासाठी मिळालेल्या पुरस्कारांची माहिती द्या. सविस्तर माहिती देऊन नाव पुरस्कारासाठी सुचविता येईल.