15 वर्षानंतर अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी अखेर भारतात

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पुन्हा एकदा सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. रवी पुजारीला भारतात आणण्यास भारतीय तपास यंत्रणांना यश आलं.पुजारी याला कर्नाटक येथील एका गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे.

Ravi Pujari
15 वर्षानंतर अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी अखेर भारतात  |  फोटो सौजन्य: ANI

बंगळुरूः अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पुन्हा एकदा सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. स्थानिक यंत्रणांच्या मदतीने रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचे अधिकारी आणि कर्नाटक पोलिसांच्या पथकानं संयुक्तपणे केलेल्या कारवाईत रवी पुजारीला बेड्या ठोकण्यात आल्यात.  त्यानंतर रवी पुजारीला भारतात आणण्यास भारतीय तपास यंत्रणांना यश आलं आहे.

पुजारी याला कर्नाटक येथील एका गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. सोनेगलमधून त्याला सकाळी नवी दिल्लीत आणण्यात आलं आणि तेथून थेट बंगळुरुला नेण्यात आलं. त्याला सकाळी 11 वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे.  RAW च्या मदतीने कर्नाटक पोलिसांच्या विशेष अधिकाऱ्यांनी त्याला पश्चिम आफ्रिकेतल्या सेनेगल इथे अटक केलं होतं. रवी पुजारी हा भारताचा वॉन्टेड आरोपी आहे. त्याच्या विरोधात मुंबई, कर्नाटकसह अनेक राज्यात जवळपास 200 गुन्हे दाखल आहेत.

रवी पुजारीला पकडण्यासाठी रॉचे अधिकारी आणि कर्नाटक पोलीस सेनेगलमध्ये गेले होते. शनिवारपासून त्यांच्या प्रत्यापर्णाची तयारी सुरू होती. ती पूर्ण झाल्यानंतर त्याला भारतात आणण्यात आलं आहे. रवी पुजारीला भारतात आणण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता अधिकाऱ्यांनी केली आणि त्याला भारतात आण्याचा मार्ग मोकळा झाला. तब्बल 15 वर्षानंतर त्याला भारतात आणण्यात तपास यंत्रणांना यश आलंय.

रवी पुजारीच्या वतीने प्रत्यार्पणास आव्हान देणारी याचिका सेनेगलच्या सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. पण ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.  रवी पुजारी हा काही काळासाठी छोटा राजनसोबत दाऊद गँगसाठी काम करायचा. त्यानंतर छोटा राजननं आणि दाऊदशी शत्रूत्व आल्यानंतर छोटा राजनसोबत गेला. 

रवी पुजारीला 21 जानेवारी 2019 ला सेनेगलची राजधानी डकारमधील एका हेअर कटिंग सलूनधून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर जून 2019 मध्ये तो फरार झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी अँटोनी फर्नांडिसच्या नावानं पासपोर्ट बनवून सेनेगलमध्ये राहत होता. हा पासपोर्ट 10 जुलै 2013 रोजी जारी करण्यात आला होता, जो 8 जुलै 2023 पर्यंत वैध आहे.

या नावानं राहत होता तिथे

रवी पुजारी हा अँथोनी फर्नांडिस या नावाने राहत होता. पासपोर्टनुसार  तो एक व्यावसायिक एजंट होता. बुर्किना फासो या देशाचा पासपोर्ट त्याच्याकडे होता. रवी पुजारीचे आधी थायलंड, मलेशिया, मोरोक्को या देशांत बस्तान होते तर नंतर पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो, कोंगो रीपब्लिक, गिनी, आयव्हरी कोस्ट आणि सेनेगल या देशांत तो आतापर्यंत राहिला. गेल्या आठ वर्षांत पुजारीनं सेनेगल, बुर्किना फासो आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये  नमस्ते इंडिया नावाच्या रेस्टॉरंट्स चालवत असे. डकारमध्ये जवळपास गेल्या दशकभरापासून तो पत्नी, मुलांसह राहत होता. 

अनेक गुन्ह्यांची नोंद

पुजारीवर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि अन्य अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कर्नाटकात बेंगळुरूमध्ये 39, मंगळूरमध्ये 36, उडुपीमध्ये 11 तर म्हैसूर, हुबळी-धारवाड, कोलार आणि शिवमोगामध्ये प्रत्येकी एक गुन्हा पुजारीविरुद्ध दाखल आहे. तर महाराष्ट्र मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये त्याच्या विरूद्ध 49 गुन्ह्यांची नोंद आहे. गुजरातमध्ये खंडणी प्रकरणी त्याच्याविरूद्ध 75 गुन्हे नोंद आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी