Chinese Beer : गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाकिस्तानमध्ये (Pakistan) चीनचा (china) दबदबा (Pressure) वाढत चालल्याचं चित्र आहे. पाकिस्तानमध्ये चीननं अनेक प्रकारच्या उद्योगधंद्यांत गुंतवणूक केली आहे. मात्र सध्या सर्वाधिक लोकप्रिय उद्योग ठरतो आहे बिअरचा. चिनी कंपनीच्या बिअरची (Beer) पाकिस्तानी नागरिकांमधून मागणी (Demand) सातत्यानं वाढत असून बिअरच्या विक्रीचे आकडे नवनवे उच्चांक गाठू लागले आहेत. चिनी बिअरची पाकिस्तानमधील मागणी वाढण्यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत. जाणून घेऊया, या कारणांविषयी.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागात चिनी बिअर कंपनीनं आपला प्रकल्प उभा केला आहे. काही वर्षांपूर्वी या भागात बिअर विक्री सुरू झाल्यानंतर नागरिकांना याची सवय जडली आणि पाहता पाहता या भागातील बिअरची मागणी वाढत गेली. सिंध प्रांताचा दक्षिण भाग आणि कराचीही व्यापारी केंद्राच्या परिसरात या बिअरचं वितरण करण्यात येतं. आकर्षक पॅकेजिंग, सहज उपलब्ध असणं आणि अल्कोहोलचं अधिक प्रमाण या कारणांमुळे स्थानिकांना ही बिअर आकर्षित करत असल्याचं सांगितलं जातं. या कंपनीसाठी चिनी कंपनीनं 2016 साली अर्ज केला होता. 2018 साली त्यांना परवाना देण्यात आला होता. कंपनीने गेल्या वर्षापासून 65 हजार ते 1 लाखच्या क्षमतेसह उत्पादनाला सुुरुवात केली होती.
चिनी कंपनी बिअरच्या तीन प्रकारच्या व्हरायटी विकते. अगोदर केवळ कॉर्पोरेट पद्धतीनेच याची विक्री करण्याची कंपनीची योजना होती. मात्र या बिअरला मिळत असलेला प्रतिसाद पाहून स्थानिक व्यापारीही ही बिअर विकण्यात रस दाखवू लागले. या बिअरच्या तीन व्हरायटी कंपनीकडून तयार केल्या जातात. त्यापैकी प्रत्येकात 500 मिली बिअर असते. स्पेशल ब्रू, हंगची एंबर लेगर आणि हुई चेंग अशी बिअरची नावं.
ही चिनी बिअर पाकिस्तानमधील मध्यम आणि उच्च मध्यम वर्गात अधिक लोकप्रिय असल्याचं सांगितलं जातं. ही बिअर लोकप्रिय असल्याची वेगवेगळी कारणं सांगितली जातात. मात्र मुख्य कारण म्हणजे इतर बिअरच्या तुलनेत यात 5 ते 8 टक्के अल्कोहोलचं प्रमाण अधिक असतं. दारुप्रेमींना ही गोष्ट सर्वाधिक आकर्षित करत असल्याचं सांगितलं जातं. चिनी बिअरमुळे जास्त नशा चढते, असा अनुभव काही पाकिस्तानी नागरिक वारंवार व्यक्त करत असल्याचं दिसतं. कमी बिअरमध्ये अधिक नशा चढत असल्यामुळे कमी खर्चात अधिक परिणामकारकता मिळत असल्याचा दावा काही मद्यप्रेमी करतात. त्याचप्रमाणं एका विदेशी कंपनीकडून तयार होणारी बिअर, हादेखील एक आकर्षणाचा विषय नागरिकांसाठी आहे.
थोडक्यात, माहिती तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात चीनने आपलं जाळं पाकिस्तानमध्ये पसरलं आहेच. मात्र बिअर कंपनीच्या माध्यमातूनही मोठं आर्थिक साम्राज्य चीनकडून उभं केलं जात आहे. याचा स्थानिक पाकिस्तानी उद्योगांना मोठा फटका बसत असल्याचं चित्र आहे.