धक्कादायक! रिलायन्सचे उपाध्यक्ष, प्रकाश शाह यांनी घेतला सन्यास, यापुढे भिक्षा मागून घालवणार आयुष्य

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 30, 2021 | 17:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये महत्त्वाची भूमिका आणि जबाबदारी सांभाळलेल्या प्रकाश शाह यांनी सन्यास घेतला आहे. त्यांनी जैन गुरूकडून दीक्षा घेतली असून यापुढे ते अतिशय साधे सरळ आयुष्य जगणार आहेत.

Reliance Former president, Prakash Shah becomes Monk
रिलायन्सचे माजी उपाध्यक्ष प्रकाश शाह झाले सन्यासी 

थोडं पण कामाचं

  • प्रकाश शाह यांनी घेतली दीक्षा
  • रिलायन्सचे माजी उपाध्यक्ष
  • पत्नीसह घेतला सन्यास

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेल्या प्रकाश शाह यांनी चक्क सन्यास घेतला आहे. जगाच्या मोह-मायेपासून दूर जात जगण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. प्रकाश शाह यापुढील आयुष्य भिक्षा मागून जगणार आहेत.

आयआयटी बॉम्बेचा केमिकल इंजिनियर

आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनियरिंगची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिडेंट) पदाची जबाबदारी सांभाळलेल्या प्रकाश शाह यांनी आता सन्सास घेतला आहे. जगाच्या व्यवहारगाड्यातून, मोह-मायेपासून लांब राहत साधना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यापुढील आयुष्य ते भिक्षा मागून व्यतित करणार आहेत. 
मागील वर्षीच प्रकाश शाह, रिलायन्स इंडस्ट्रीजमधील आपल्या पदावरून निवृत्त झाले होते. तिथे त्यांना गलेलठ्ठ पगार मिळत होता. मात्र आता ते सर्व संसारी बंधनांना तोडून एका भिक्षुकाचे आयुष्य जगणार आहेत. प्रकाश शाह यांनी एका जैन मुनींकडून दीक्षा घेतली आहे.

पत्नीनेदेखील दिली साथ


गृहस्थ आयुष्याच्या त्याग करत सन्यासी बनण्याच्या प्रकाश शाह यांच्या निर्णयात त्यांची पत्नी नैना यांचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या पत्नीने त्यांच्या या मोठ्या निर्णयात त्यांना साथ दिली आहे. या दोन्ही पती - पत्नीने मागील आठवड्यात मुंबईत जैन धर्मानुसार दीक्षा घेतली आहे. आता हे दांपत्य अतिशय साधी राहणीमान आचरणात आणणार आहेत. ते साधे कपडे परिधान करणार असून भिक्षा मागून आपले आयुष्य व्यतित करणार आहेत. असे सांगितले जाते की प्रकाश शाह हे आधीपासूनच दीक्षा घेऊ इच्छित होते, मात्र कोरोनाच्या संकटामुळे त्यांनी आपला निर्णय एक वर्षासाठी पुढे ढकलला होता.

कमावले मोठे यश


प्रकाश शाह यांनी रिलायन्स समूहात जवळपास एक दशक काम केले. त्यांनी आपल्या करियरमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. रिलायन्सच्या जामनगर येथील पेटकोक गॅसिफिकेशन प्रकल्पाला सुरू करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. प्रकाश शाह यांनी ४० वर्षांपूर्वी आयआयटी बॉम्बे येथून केमिकल इंजिनियरिंगची पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवली होती. त्यांची पत्नी नैना या कॉमर्सच्या पदवीधर आहेत.

मुलानेही घेतला आहे सन्सास


प्रकाश शाह यांच्याआधी त्यांच्या एका मुलानेदेखील सात वर्षांपूर्वीच सन्यास घेतला आहे. त्यांच्या मुलाने सात वर्षांआधीच दीक्षा घेतली होती. या मुलानेदेखील आयआयटी बॉम्बे येथून इंजिनियरिंगची पदवी घेतली आहे. प्रकाश शाह यांना दुसरा मुलगादेखील आहे. तो मात्र संसारी आयुष्यच जगतो आहे. त्याला एक अपत्यदेखील आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने मागील काही काळात अनेक नवीन योजना आखल्या असून आपल्या मूळ व्यवसायाइतकाच विस्तार दूरसंचार आणि रिटेल क्षेत्रात करण्याची कंपनीची योजना आहे. मुकेश अंबानी यांनी मागील वर्षी रिलायन्स जिओच्या माध्यमातून मोठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक उभी केली आहे. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज कर्जमुक्त कंपनीदेखील झाली आहे. रिलायन्स जिओमध्ये फेसबुकने मोठी गुंतवणूक केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी