Remdesivir Injection:सरकारच्या हस्तक्षेपानंतर स्वस्त झाले रेमडेसिविर इंजेक्शन, विविध कंपन्यांच्य किंमती जाणूया

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 17, 2021 | 22:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

इंजेक्शनचा तुटवडा आणि मागणी लक्षात घेऊन सरकारने रेमडेसिविरचे उत्पादन दुप्पट करण्यास परवानगी दिली आहे. तर सरकारच्या हस्तक्षेपानंतर औषध उत्पादकांनी या इंजेक्शनच्या किंमतीत कपात केली आहे.

Remdesivir injection price to be reduced, after governments intervention
रेमडेसिविर इंजेक्शनची किंमत झाली कमी, पुरवठाही होणार सुरळीत 

थोडं पण कामाचं

  • सरकारच्या हस्तक्षेपानंतर इंजेक्शनच्या किंमतीत कपात
  • जवळपास ५० टक्क्यांनी किंमत कमी
  • पुढील ७ ते १० दिवसात पुरवठा सुरळीत

नवी दिल्ली : सरकारच्या हस्तक्षेपानंतर अॅंटी व्हायरल ड्रग, रेमडेसिविरच्या  (anti viral drug remdesivir) किंमतीत मोठी घट झाली आहे. प्रति १०० मिलीग्रॅमच्या डोससाठीच्या रेमडेसिविरच्या इंजेक्शनसाठीच्या किंमतीत आधीच्या तुलनेत जवळपास ३५०० रुपयांची घट (Remdesivir Price Reduced) झाली आहे. कोणत्या कंपनीच्या इंजेक्शनची नवी किंमत (New Rates of Remdesivir) किती आहे हे विस्ताराने पाहूया.

कोरोना 2.0 जितक्या वेगाने वाढत आहे तितक्याच वेगाने संपुष्टात येणार, क्रेडिट सुसेच्या अभ्यासात दावा

सरकारचा हस्तक्षेप


देशात रेमडेसिविर या अॅंटी व्हायरल ड्रगच्या इंजेक्शनची किंमत कमी झाली आहे. इंजेक्शनचा तुटवडा आणि मागणी लक्षात घेऊन सरकारने रेमडेसिविरचे उत्पादन दुप्पट करण्यास परवानगी दिली आहे. तर सरकारच्या हस्तक्षेपानंतर औषध उत्पादकांनी या इंजेक्शनच्या किंमतीत कपात केली आहे. त्यामुळे आधीच्या तुलनेत रेमडेसिविरचे इंजेक्शन आता तुलनात्मकरित्या स्वस्त झाले आहे.

नवी किंमत किती आहे


कॅडिला हेल्थकेअर लि.ने REMDAC इंजेक्शनची किंमत २८०० रुपयांवरून कमी करून ८९९ रुपये केली आहे.
सिंजीन इंटरनॅशनल लि.ने RemWin इंजेक्शनची किंमत 3950 रुपयांवरून कमी करून 2450 रुपये केली आहे.
डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज लि.ने REDYX इंजेक्शनची किंमत 5400 रुपयांवरून कमी करून 2700 रुपये केली आहे.
सिपल लि.ने CIPREMI इंजेक्शनची किंमत 4000 रुपयांवरून कमी करून 3000 रुपये केली आहे.
माईलान फार्मास्युटिकल्स प्रा. लि.ने DESREM इंजेक्शनची किंमत 4800 रुपयांवरून कमी करून 3400 रुपये केली आहे.
ज्युबिलंट जेनेरिक लि.ने JUBI-R इंजेक्शनची किंमत 4700 रुपयांवरून कमी करून 3400 रुपये केली आहे.
हेटेरो हेल्थकेअर लि.ने COVIFOR इंजेक्शनची किंमत 5400 रुपयांवरून कमी करून 3490 रुपये केली आहे.

मोक्याच्या क्षणी निर्णय


कोविड-१९च्या वाढत्या रुग्णांना दिलासा देत सरकारने रेमडेसिविर इंजेक्शनची किंमत जवळपास ५० टक्क्यांनी कमी केली आहे. कोरोना महामारीच्या  दुसऱ्या लाटेनंतर देशात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत होता. भारतात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होते आहे. मागील २४ तासात २,३४,६९२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात ६३,७२९ रुग्णांची एका दिवसात नोंद केली आहे. याखालोखाल उत्तर प्रदेशात २७,३६० रुग्णांची, दिल्लीत १९,४८६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 

महाराष्ट्रात सध्या ६,४७,९३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशातील एक लाख २३ हजार ३५४ जण मागील चोवीस तासात कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात २४ तासात १,३४१ कोरोना मृत्यू झाले आहेत. देशात आतापर्यत एकूण १ कोटी ४५ लाख २६ हजार ६०९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. भारतात सध्या १६ लाख ७९ हजार ७४० अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

रेमडेसिविरचे उत्पादन होणार दुप्पट


मागील काही दिवसात देशात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत होता. आता सरकारने ही बाब लक्षात घेऊन रेमडेसिविरची क्षमता दुप्पट करण्याची परवानगी दिली आहे. आतापर्यत दर महिन्याला ३८.८ लाख रेमडेसिविर इंजेक्शनचे उत्पादन होत होते. आता ७८ लाख इंजेक्शन प्रति महिना इतके उत्पादन घेता येणार आहे.

डिसेंबरनंतर मागणी घटल्यानंतर कमी केले उत्पादन


फार्मा इंडस्ट्रीनुसार डिसेंबर २०२० नंतर कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत घट झाली होती. त्यामुळे फेब्रुवारीपासून कंपन्यांनी याचे उत्पादन कमी केले होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने या इंजेक्शनचा तुटवडा भासत होता. कंपन्या या इंजेक्शनचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर करू शकत नाहीत. कारण या औषधाची शेल्फ लाईफ ६ ते ८ महिन्यांची असते. 

किती दिवसात तुटवडा दूर होणार


रेमडेसिविरचा तुटवडा पुढील काही दिवसात कमी होईल. यासाठी सरकार आणि इंडस्ट्री एकत्रितरित्या काम करत आहेत. मार्चच्या मध्यापासून कंपन्यांनी याचे उत्पादन वाढवले आहे. पुढील ७ ते १० दिवसात १० लाख ते २० लाख डोस बाजारात उपलब्ध होतील. सरकारने रेमडेसिविरच्या निर्यातीवर बंदी घातल्यानेही परिस्थिती सुधरण्यास मदत होईल, असे मत इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष महेश दोषी यांनी व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी