BJP Parliamentary Board: पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे काय? कुठले असतात अधिकार? वाचा सविस्तर

भाजप पार्लमेंटरी बोर्ड ही भाजपची सर्वोच्च बॉडी आहे. भाजपच्या राष्ट्रीय प्रदेशाध्यक्षकांकडून या बोर्डवरच्या सदस्यांच्या नेमणुका होतात.

BJP Parliamentary Board
पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे काय?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पार्लमेंटरी बोर्ड ही भाजपची सर्वोच्च संस्था
  • लोकसभा आणि विधानसभेतील धोरण ठरतं
  • मुख्यमंत्र्यांचे नावही बोर्डात होत निश्चित

BJP Parliamentary Board: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान (Shivraj Singh Chouhan) यांना भाजपनं पार्लमेंट्री बोर्डातून वगळल्यामुळे या मुद्द्याची सध्या देशभर चर्चा आहे. आपण जाणून घेऊया की पार्लमेंटरी बोर्ड का महत्त्वाचं आहे, त्याच्याकडे कुठले अधिकार असतात आणि नेमका काय विचार करून नव्या सदस्यांची नेमणूक करण्यात आलीय.

सर्वोच्च संस्था

भाजप पार्लमेंटरी बोर्ड ही भाजपची सर्वोच्च संस्था आहे. भाजपच्या राष्ट्रीय प्रदेशाध्यक्षकांकडून या बोर्डवरच्या सदस्यांच्या नेमणुका होतात. यापूर्वी २०१४ साली पार्लमेंट्री बोर्डाच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आतापर्यंत पक्षाध्यक्ष पकडून ११ सदस्य या बोर्डात असायचे. आता बोर्डावर १५ सदस्यांची नियुक्ती करण्यात आलीय.

पक्षाचे ध्येयधोरण

संसदेतील आणि वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभेत असणारे पक्षाचे गट कशी कामगिरी करतायत, यावर लक्ष ठेवण्याचं काम असतं. त्याचप्रमाणं पक्षाच्या सर्व खासदारांना आणि आमदारांना मार्गदर्शन करणे आणि पक्षाच्या वेगवेगळ्या पातळीवरच्या संघटनांना मार्गदर्शन करणे, धोरण ठरवून देणे यासारखी कामं संसदीय बोर्डाकडून केली जातात.

मुख्यमंत्री ठरवण्याचे अधिकार

कुठल्याही राज्याच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी तिथला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, हे ठरवण्याचे अधिकार पार्लमेंटरी बोर्डाला असतात. किंवा एका व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करून त्याच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याचा निर्णयही पार्लमेंटरी बोर्डात होतो. 

अधिक वाचा - Zomato Ad Controversy: झोमॅटोने मागितली माफी, हृतिकची जाहिरात मागे घेतली

तिकीट वाटपाचे अधिकार

भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य हे केंद्रीय निवडणूक समितीचेही सदस्य असतात. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कुणाला तिकीट द्यायचं याचा निर्णयसुद्धा हे सदस्य घेत असतात. 

पक्षाची घटना

पक्षाची घटना कशी असावी हे पार्लमेंटरी बोर्ड ठरवतो. घटनेत बदल करण्याचे अधिकार हे फक्त पार्लमेंटरी बोर्डालाच असतात. 

पाच जागा रिक्त

यापूर्वी २०१४ साली अमित शाह भाजपचे अध्यक्ष असताना पार्लमेंटी बोर्डाच्या सदस्यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या काही वर्षात बोर्डावरच्या पाच जागा रिक्त होत्या. 

अनंत कुमार - मृत्यू

अरुण जेटली - मृत्यू

सुषमा स्वराज - मृत्यू

व्यंकय्या नायडू - उपराष्ट्रपती

थावरचंद गेहलोत - राज्यपाल

अधिक वाचा - Jammu & Kashmir : जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती नजर कैदेत, मुफ्ती यांनी शेअर केले फोटो

नवे मेंबर्स कोण आहेत बघुया. 

  • सर्बानंद सोनोवाल - भाजपच्या ईशान्येतील प्रमुख चेहरा, आसामचे माजी मुख्यमंत्री, भाजपचा आदिवासी चेहरा
  • सुधा यादव - हरियाणाच्या माजी खासदार, त्यांचे पती डेप्युटी कमांडंट सुखबिर सिंग यादव हे कारगिल युद्धात शहीद झाले होते. त्यावेळी सुधा यादव या लेक्चरर म्हणून नोकरी करत होत्या. त्यांना दोन मुलं आहेत. १९९९ साली भाजपने त्यांना हरियाणातल्या महेंद्रगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. काँग्रेसचे दिग्गज नेते राव इंद्रजित सिंग यांचा त्यांनी पराभव केला होता. रुडकी विद्यापीठातून त्यांनी केमिस्ट्रीमध्ये पीएचडी केली आहे. 
  • के. लक्ष्मण - तेलंगणातील भाजपचा ओबीसी चेहरा ही त्यांची ओळख आहे. तेलंगणामध्ये पुढच्या वर्षी म्हणजे २०२३ साली विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर के. लक्ष्मण यांचा समावेश करण्यात आलाय. आपल्या उत्तम संघटन कौशल्यासाठी ते ओळखले जातात. २०१६ ते २०२० या कालावधीत ते तेलंगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत त्यांना भाजपने उत्तर प्रदेशातून निवडून दिलं. 
  • बी. एस. येडियुरप्पा - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज असल्याची चर्चा होती. विशेषतः मुख्यमंत्रीपदावरून त्यांना पायउतार व्हावं लागल्यानंतर ते पक्षात फारचे सक्रीय नव्हते. येडियुरप्पांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर त्यांच्या मुलालाही पक्षात किंवा सरकारमध्ये कुठलंही वजनदार पद मिळालेलं नाही.  कर्नाटकातील लिंगायत समाज हा भाजपपासून दूर जाऊ नये आणि येडियुरप्पा यांची नाराजी काही प्रमाणात कमी करता यावी, यासाठी त्यांना पार्लमेंटरी बोर्डावर घेतल्याची चर्चा आहे. कर्नाटकमध्येही पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि आपल्या शिवमोगा जिल्ह्यातील आपल्या शिकारीपुरा मतदारसंघातून आपला मुलगा विधानसभेची जागा लढवेल, असं त्यांनी परस्पर घोषितही करून टाकलंय.
  • इकबाल सिंग लालपुरा - जर्नेल सिंग भिंद्रेनवालाला ज्या तीन आयपीएस अधिकाऱ्यांनी अटक केली त्यापैकी इकबाल सिंग लालपुरा हे एक अधिकारी. 2012 साली सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते भाजपच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत. कुठल्याही आयोगावर असणाऱ्या सदस्याला पक्षाच्या बोर्डावर नियुक्त करण्याची ही भाजपची पहिलीच वेळ आहे. यापुढे ते पहिलं पद सोडतात की त्यावर कायम राहतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. 
  • सत्यनारायण जटिया - भाजपचे ओबीसी आणि कामगार नेते. 77 वर्षांचे भाटिया हे 1972 सालापासून भाजपसोबत आहेत. मध्यप्रदेशमध्ये भारतीय मजदूर संघाचे नेते म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना बोर्डातून काढून टाकण्यात आलं आणि मध्यप्रदेशच्याच सत्यनारायण जटिया यांना बोर्डावर घेण्यात आलं. त्यामुळे एक प्रकारे बॅलन्स साधण्याचा प्रयत्न पक्षानं केला, असं मानलं जातं. मध्यप्रदेशमध्येही पुढच्या वर्षी निवडणुका आहेत. मध्यप्रदेशात ५१ टक्के ओबीसी मतदार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते सत्यनारायण जटिया यांच्या नियुक्तीकडे पाहिलं जातंय. एक संवेदनशील कवी म्हणूनही जटिया यांची ओळख आहे.
  • देवेंद्र फडणवीस - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री. नितीन गडकरी महाराष्ट्राच्या राजकारणात आता सक्रीय नसल्यामुळे त्यांच्याऐवजी फडणवीसांना त्यांच्या जागी स्थान देण्यात आल्याची चर्चा आहे. त्याशिवाय केंद्र सरकारच्या कारभाराविषयी नुकतंच नितीन गडकरींनी भाष्य केलं होतं. त्यावर पक्षातून सगळ्यांनीच मौन बाळगलं होतं. त्या विधानाचं हे प्रत्युत्तर असावं, अशीही चर्चा आहे. उपमुख्यमंत्रीपद घेण्याची इच्छा नसतानाही आयत्या वेळी ते घ्यावं लागल्यामुळे फडणवीसही नाराज होते. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाने केल्याचं मानलं जातं. शिवाय २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पूर्ण विश्वासातली आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं आव्हान देऊ शकणार नाही, अशी टीम मोदी-शहांना हवी असावी, अशीही चर्चा आहे. 
  • वनथी श्रीनिवासन - भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत आणि तमिळनाडूतील कोईमतूर दक्षिण विधानसभेच्या आमदार आहेत. 1993 पासून चेन्नई हायकोर्टात त्या वकिली करतात. 
  • भुपेंद्र यादव- केंद्रीय मंत्री आहेत. कामगार, पर्यावरण बदल आणि कामगारमंत्रीपद त्यांच्याकडे आहे. २०१२ पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत.
  • ओम माथूर - ज्येष्ठ भाजप नेते आणि राज्यसभा सदस्य आहेत. एकेकाळी आरएसएसचे प्रचारक म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. 

अधिक वाचा - Dalit Minor Girl Raped : राजस्थानमध्ये अल्पवयीन दलित मुलीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल

भाजपच्या नव्या पार्लमेंटरी बोर्डावरील सदस्य 

  1. पक्षाध्यक्ष जेपी नड्डा 
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदी 
  3. गृहमंत्री अमित शाह 
  4. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग 
  5. बी. एस. येडियुरप्पा
  6. सर्बानंद सोनोवाल 
  7. के.लक्ष्मण
  8. इकबाल सिंग लालपुरा
  9. सुधा यादव
  10. सत्यनारायण जटिया
  11.  भूपेंद्र यादव
  12. देवेंद्र फडणवीस 
  13.  ओम माथूर
  14. बी. एल. संतोष
  15. वनथी श्रीनिवासन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी