Rishbah Pant News, Dehradun News, Rishabh Pant Accident News, Rishabh Pant belongings were not stolen after accident says Uttarakhand Police : टीम इंडियाचा विकेटकीपर रिषभ पंत याचा शुक्रवारी पहाटे अपघात झाला. कारने दिल्लीतून उत्तराखंड येथे जाताना रिषभ पंतची कार सुसाट वेगाने रूरकी (Roorkee) येथे डिव्हायडरवर आदळली. कारला आग लागली. आगीत कार भस्मसात झाली. कारला आग लागली त्यावेळी रिषभ पंत पटकन कारमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाला आणि वाचला. रिषभ पंतला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे रिषभ पंतची प्रकृती सध्या स्थिर आहे.
कारच्या अपघातानंतर रिषभ पंतचे सामान आणि पैसे चोरण्यात आल्याचे वृत्त पसरले. या वृत्ताबाबत उत्तराखंड पोलिसांच्यावतीने हरिद्वारचे एसएसपी अजय सिंह यांनी निवेदन दिले. अपघातानंतर उत्तराखंड पोलिसांच्या मदतीनेच रिषभ पंतला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रथमोपचार केल्यानंतर रिषभ पंतला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी नेण्यात आले. सध्या डेहराडून (Dehradun) येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये रिषभ पंतवर उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती स्थिर आहे. अपघाताची माहिती रिषभ पंतच्या आईला देण्यात आली आहे. माहिती मिळताच आई रिषभला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आली आहे. काही माध्यमांकडून अपघातानंतर रिषभ पंतचे पैसे, चेन, इतर मौल्यवान सामान यांची चोरी झाल्याचे वृत्त दिले जात आहे. पण या वृत्तात तथ्य नाही.
रोडवेजच्या कर्मचाऱ्यांनी फोन करुन माहिती देताच उत्तराखंड पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी रिषभ पंतला शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत मिळवून दिली. पंतवर शक्य तितक्या लवकर उपचार व्हावेत आणि त्याची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी पोलिसांनी शक्य तेवढे प्रयत्न केले गेले.
अपघात झाला त्यावेळी रिषभ पंतकडे एक प्लॅटिनमची चेन, एक गोल्ड ब्रेसलेट, चार हजार रुपये रोख रक्कम हे मौल्यवान सामान होते. हे मौल्यवान सामान आणि रिषभ पंतचे कपडे या सर्व वस्तू उत्तराखंड पोलिसांनी ताब्यात घेतल्या. तब्येत स्थिर झाल्यावर ताब्यात घेतलेल्या वस्तू रिषभ पंतला दाखविण्यात आल्या. पंतने वस्तू ओळखल्या. यानंतर हे सामान रिषभ पंतच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी तपासले आहे. रिषभ पंतकडे असलेल्या वस्तूंची चोरी झालेली नाही. या वस्तू पोलिसांनी नियमानुसार अपघातानंतर ताब्यात घेतल्या आणि ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यावर रिषभ पंतच्या आईकडे सोपवल्या आहेत.
रिषभ पंतकडे असलेल्या वस्तूंची चोरी झाल्याच्या वृत्तात तथ्य नाही, असे हरिद्वारचे एसएसपी अजय सिंह म्हणाले. त्यांनी रिषभ पंतच्या नातलगांच्या संपर्कात असल्याचे सांगितले.
gym owner murder : जिम मालकाची हत्या, ऑफिसमध्ये घुसून केला गोळीबार
अपघात झाल्यावर जखमी झालेल्या रिषभ पंतला 'हरियाणा राज्य परिवहन निगम'च्या चालक सुशील कुमार आणि वाहक परमजीत यांनी मदत केली होती. नंतर रोडवेज कर्मचाऱ्यांनी माहिती दिली आणि पुढील मदतीसाठी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. याआधी रिषभ पंतला अपघात झालेल्या लक्झरी कारमधून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी सुशील कुमार आणि परमजीत यांनी मदत केली होती. ही घटना दिल्ली-डेहराडून राजमार्गावर झाली. रिषभ पंतची मदत करणाऱ्या सुशील कुमार आणि परमजीत यांचा 'हरियाणा राज्य परिवहन निगम'ने सत्कार केला.