Russia Business | रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) काही दिवसांत संपेल, असा अंदाज होता. मात्र आता तीन महिने उलटूनही युद्धाचा ज्वर कमी झालेला नाही. या काळात अमेरिकेनं रशियावर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला होता. या निर्बंधांमुळे रशियाचं मोठं आर्थिक नुकसान होईल आणि रशिया गुडघ्यावर येईल, असा अमेरिकेचा अंदाज होता. मात्र हा अंदाज रशियाने साफ चुकवला असून निर्बंधांच्या काळात घसघशीत कमाई केली आहे.
रशियाने युक्रेनसोबत सुरू असलेल्या लढाईदरम्यान पहिल्या 100 दिवसांत जीवाश्म इंधनाच्या निर्यातीतून 98 बिलियन डॉलरची घसघशीत कमाई केली आहे. युरोपिय महासंघानं सर्वाधिक जीवाश्म इंधन रशियाकडून विकत घेतलं आहे. अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला होता, मात्र प्रत्यक्षात रशियाने या काळात जीवाश्म इंधनाची विक्री करून मोठा नफा कमावला आहे.
फिनलॅडच्या सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) च्या अहवालानुसार या महिन्याच्या सुरुवातीलाच युरोपीय महासंघानं रशियाकडून तेलाची आयात बंद करण्याबाबतचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात मात्र युरोपीय महासंघ तेलाच्या बाबतीत रशियावर सर्वाधिक अवलंबून आहे. मात्र अमेरिकेच्या निर्बंधांमुळे रशियातून निर्यात होणाऱ्या गॅसच्या प्रमाणात मात्र घट नोंदवण्यात आली आहे.
अहवालात मांडण्यात आलेल्या आकडेवारीनुसार युद्धाच्या 100 दिवसांच्या काळात रशियानं जितकं जीवाश्म इंधन निर्यात केलं, त्यापैकी 61 इंधन हे युरोपात पाठवलं आहे. याची किंमत आहे तब्बल 60 बिलियन डॉलर.
युरोपीय युनीयनपाठोपाठ चीनकडून सर्वाधिक जीवाश्म इंधनाची खरेदी करणारा देश ठरला आहे चीन. चीननं रशियाकडून 12.6 बिलियन युरो, जर्मनीनं 12.1 बिलयन युरो तर इटलीनं 7.8 बिलियन युरो किंमतीच इंधन खरेदी केलं आहे. जीवाश्म इंधनाच्या निर्यातीतून रशिया यापूर्वी 46 बिलियन युरोची कमाई करत असे. त्याखालोखाल गॅस पाईपलाईन, तेल उत्पादन, एलएनजी आणि कोळसा या माध्यमातून कमाई करत होता. युद्धामुळे हा आकडा मात्र रशिया गाठू शकलेला नाही. मे महिन्यात रशियाकडून होणाऱ्या निर्यातीत घट झाली आहे.
युक्रेनसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर रशियानं क्रूड ऑईलच्या दरात सूट देण्याची घोषणा केली होती. याचा सर्वाधिक फायदा युरोपीय देशांनीच घेतल्याचं चित्र आहे. जागतिक बाजारपेठेतील दरांपेक्षा 30 टक्के कमी किंमतीत आपण क्रूड ऑईलची विक्री करू, अशी ऑफर रशियाने दिली होती. युरोपात आयात करण्यात आलेल्या एकूण तेलापैकी 27 टक्के वाटा हा रशियातून आयात झालेल्या तेलाचा आहे. युद्ध आणि निर्बंध असतानाही रशियातून सर्वाधिक आयात युरोपनेच केली आहे. भारतानेदेखील रशियाकडून क्रूड ऑईलची खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. थोडक्यात, युद्ध आणि निर्बंधांमुळे रशियाचा व्यापार काही अंशी कमी झाला असला तरी फारसा फटका बसलेला नाही.